तुरुंगाधिकारी कांबळे मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल
बीड । वार्ताहर
जिल्हा कारागृहातील वरिष्ठ तुरुंगाधिकारी संजय कांबळे यांचा कोरोनामुळे लोटस हॉस्पिटलमधील कोविड कक्षात मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप झाला होता. जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती नेमली होती. नंतर 48 दिवसांनंतर समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अहवाल दिला, या अहवालानूसार ‘लोटस हॉस्पीटलमधील डॉक्टर व परिचारिकांकडून त्या परिस्थितीत केलेले उपचार योग्य होते. त्यामुळे लोटस हॉस्पिटलने निष्काळजी केली असे म्हणता येणार नाही’ असे स्पष्ट केले आहे.
बीड येथील वरिष्ठ तुरुंगाधिकारी संजय कांबळे हे 23 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याने लोटस हॉस्पिटलच्या कोविड कक्षात उपचारासाठी दाखल झाले होते. 1 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 3 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता त्रास होऊ लागल्याने ते दुचाकीवरुन लोटस हॉस्पिटलमध्ये गेले. त्यानंतर काही वेळेतच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर10 नोव्हेंबर रोजी अशोक सुखवसे यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली. नंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय राऊत, डॉ. पारस मंडलेचा ही तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमण्यात आली होती. या समितीने सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना अहवाल सादर केला. यात लोटस हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिका यांचे जवाब घेण्यात आले. त्यांनी उपचार केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा डॉक्टर व परिचारिका यांनी त्या परिस्थितीत केलेले उपचार योग्य होते. त्यामुळे लोटस हॉस्पिटलने निष्काळजी केली असे म्हणता येणार नाही, असे अहवालात नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणात चौकशीसाठी नेमलेल्या समितीने चौकशीसाठी तब्बल 48 दिवसांचा अवधी लावला त्यामुळे या अहवालावर अशोक सुखवसे यांनी आक्षेप घेतला आहे.
Leave a comment