मुख्य वनसंरक्षक काकोरकरांनी काढला आदेश
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात तीन जणांचा बळी तर पंधरा ते वीस व्यक्तीवर हल्ला करणार्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची अखेर परवानगी देण्यात आली आहे. याबद्दलचा आदेश मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्याचे नितीन काकोडकर यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात बिबट्याने धुडगूस घातला आहे. या नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत 3 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळेच मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट्याला पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे बेशुद्ध करून बंदीस्त करण्याचे आदेश दिले आहे. जर बिबट्या जेरबंद किंवा बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास त्याला ठार मारण्यात यावे, अशी परवानगी देण्यात आली आहे.
या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी पालकमंत्री धनजय मुंडे आणि भाजपाचे आमदार आमदा सुरेश धस यांनी पाठपुरावा केला होता. आष्टी अंतर्गत सुरुडी, किन्ही, मंगरुळ , पारगाव परिसरात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत तीन जणांचा बळी घेतला होता.
29 नोव्हेंबर रोजी नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यातील पारगांव बोराडे इथं एका 45 वर्षीय महिलेवर हल्ला करत जीव घेतला होता. सुरेखा नीलकंठ भोसले असं मयत महिलेचं नाव आहे. या हल्ल्यानंतर बीडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृतांची संख्या ही 3 वर पोहोचली होती. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
यानंतर महाराष्ट्रातील वनविभागाचे पथक या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आतापर्यंत जेरबंद करण्यात यश आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
Leave a comment