मुंबई : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आमची व्यापक भूमिका आहे. राज ठाकरे यांची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण त्याचवेळी आमचं अगदी स्पष्ट मत आहे, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काकरता लढलंच पाहिजे. पण त्याच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही”, अशी भूमिका भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘एका न्यूज़ चैनल’सोबत बोलताना मांडली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येईल का? असा सवाल भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं
“आमच्यासोबत काही छोटे मित्र आहेत. त्या व्यतिरिक्त कुणासोबत जायचं याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत आमची चर्चाही झालेली नाही. हिंदुत्वाचा विचार कुणी मांडत असेल तर त्याचं आकलन निश्चितपणे करता येईल. पण आजतरी आम्ही ते केलेलं नाही. सध्या तरी आमचे जे छोटे मित्र आहेत त्यांच्या भरोशावरच आम्हाला निवडणूक लढवायची आहे”, असं फडणवीस यांनी सांगितलं.
“आम्ही व्यापक हिंदुत्ववादी आहोत. या देशाची संस्कृती जे आपली मानतात अशा सर्व लोकांना आम्ही हिंदुत्वाच्या व्याख्यात घेतलं आहे. कुणाची व्याख्या आमच्या व्याख्याशी जुळली तर त्यांना सोबत घ्यायला आम्हाला हरकत नाही. पण आजतरी आम्ही लक्ष ठेवून आहोत”, असं फडणवीस म्हणाले.
“वाद आम्हाला मान्य नाही. मराठी माणसाच्या हक्काकरता आम्हीदेखील शेवटपर्यंत लढू. पण त्यासोबत अमराठी माणसावर अन्याय करणं म्हणजे मराठी माणसाकरता लढणं असं आमचं मत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
Leave a comment