राज्यात झालेल्या पदवीधर निवडणुकांमध्ये भाजपला मोठा पराभव पाहावा लागला. तर तीन तिघाडी काम बिघाडी अशी टीका होणारं सरकार जिंकून आल्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही मोठा जल्लोष केला. पदवीधर निवडणुकांचा निकाल समोर येताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एका व्यक्तव्यावरून चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. याबद्दल थेट चंद्रकांत पाटील यांनाच विचारलं असता त्यांनी मौन बाळगला.
खरंतर, पदवीधर निवडणुकांमध्ये जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं होतं. भाजपच्या पराभवानंतर आता चंद्रकांत पाटील खरंच हिमालयात जातील अशी टीका ठाकरे सरकारच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. यावर आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
भाजपचा पराभव झाला आता तुम्ही हिमालयात जाणार का? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगलं. त्यांच्या या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी त्यांना टार्गेट केलं होतं. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे, अशी खोचक टिप्पणी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली होती.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढली. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं होतं. ते पुण्यात वर्षपूर्ती कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती.
Leave a comment