अमित चांदोले यांच्यावतीने गंभीर दावा!
मुंबई / प्रतिनिधि
मनी लाँडरिंग प्रकरणी अटकेत असलेले अमित चांदोले यांच्यावतीने गुरुवारी मुंबई हायकोर्टात ईडीबाबत गंभीर दावा करण्यात आला. चांदोले हे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय आहेत.मनी लाँडरिंग प्रकरणात अमित चांदोले यांची ईडी कोठडी वाढवली नाही म्हणून कनिष्ठ न्यायालयाविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अर्जावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज राखून ठेवला आहे. आज चांदोले यांच्या वकिलांनी न्यायालयात ईडीवर गंभीर आरोप केला.
मनी लाँडरिंग प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे गुंतले असल्याचा जबाब सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीला माझ्याकडून हवा आहे, म्हणूनच माझी इडी कोठडी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर दावा सरनाईक यांचे निकटवर्तीय असलेले आरोपी अमित चांदोले यांच्यातर्फे गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर ईडीने हा दावा फेटाळून लावला.
'अनेक पुरावे असूनही आणि मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार झाल्यााविषयी अनेकांचे जबाब असूनही विशेष न्यायालयाने चुकीचा आदेश देऊन चांदोलेची आणखी ईडी कोठडी देण्यास नकार दिला. चांदोलेकडून प्रताप सरनाईक यांना पैसे जात होते, असे पुराव्यांतून दिसते आहे. त्यामुळे चांदोलेची अधिक चौकशी करण्याची संधी मिळाली तर पूर्ण सत्य बाहेर येईल, असा युक्तिवाद ईडीतर्फे करण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाने ईडीच्या फेरविचार अर्जावरचा आपला निकाल राखून ठेवला आहे.
तीन दिवसांची मुदत सरनाईक यांना हवी ?
टॉप्स सेक्युरिटीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने २५ नोव्हेंबर रोजी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे घर व कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यावेळी सरनाईक घरी नव्हते. ईडीच्या पथकाने सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले होते. त्यांची ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी करण्यात आल्यानंतर पाच तासांनी त्यांना सोडण्यात आले होते. दरम्यान, त्याचदिवशी सायंकाळी गोव्यातून मुंबईत दाखल झालेल्या प्रताप सरनाईक यांनी करोनामुळे क्वारंटाइन व्हावे लागत असल्याचे कारण देत चौकशीसाठी हजर राहण्यास मुदत मागितली होती. ही आठवड्याची मुदत संपल्यानंतरही ते ईडीसमोर हजर झालेले नाहीत. त्यांनी आता आणखी तीन दिवसांची मुदत ईडीकडे मागितल्याचे कळते.
Leave a comment