'एक मराठा, लाख मराठा, मिळेल अनुदान तरच मतदान'
औरंगाबाद । वार्ताहर
विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यावर 17 हजार 372 मतांची आघाडी घेतली आहे. चव्हाण यांना 27 हजार 879 तर बोराळकर यांना 10973 मते मिळाली.
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील मराठवाडा रिअलटर्स कंपनीत मतमोजणीस प्रारंभ झाला. मतपत्रिका एकत्रित करून 25 चे गठ्ठे तयार करण्यास दुपारचे तीन वाजले. मतमोजणी अतिशय संथगतीने पुढे जात आहे. पहिल्या फेरीचा निकाल सायंकाळी जाहीर करण्यात आला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत 2 लाख 40 हजार 166 मतदान झाले होते. पदवीधरमध्ये पहिल्यांदाच विक्रमी 64.53 टक्के विक्रमी मतदान झाले होते. एकूण 35 उमेदवार रिंगणात होते. विक्रमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार या विषयी उत्सुकता होती.
बाद मतांमुळे वाद...
मते बाद ठरविण्यावरून उमेदवार प्रतिनिधी व मतमोजणी कर्मचाऱ्यात वादावादीच्या घटना घडल्या. संशयित मते बाजूला ठेऊन त्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहीर केले.
भाजपचे बंडखोर रमेश पोकळे तसेच अपक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी पहिल्या फेरीत लक्षणीय मते घेतली. त्यामुळे पहिल्या फेरीची मते बीड जिल्ह्याची असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. सतीश चव्हाण आघाडीवर असल्याचे बघून भाजपचे शिरीष बोराळकर यांनी दुपारी 4 वाजता मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. तर दुसरीकडे आघाडी वाढत अडल्याचे कळताच सतीश चव्हाण यांचे सायंकाळी पाच वाजता आगमन झाले.
मतपत्रिकांवर मराठा आरक्षण, शिक्षक अनुदानावर भाष्य...
पदवीधरच्या निवडणुकीसाठी पहिल्या फेरीची मतमोजणी सुरु असताना जवळपास ५५०० मतपत्रिका बाद ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व बाद मतपत्रिकांवर 'एक मराठा, लाख मराठा, मिळेल अनुदान तरच मतदान' असे लिहिले आहे. या प्रकारामुळे रेंगाळत असलेल्या मराठा आरक्षणाचा मतदारांमध्ये असलेला तीव्र रोष दिसून आला आहे.
मराठवाडा पदवीधर मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांनी जवळपास १७ हजाराची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीच्या ५६ हजार मतांमध्ये अवैध ठरलेल्या मतांची संख्या लक्षणीय ठरली आहेत. या फेरीत तब्बल ५५०० मते बाद झाली आहेत. विशेष म्हणजे बाद झालेल्या जवळपास सर्व मतपत्रिकांवर 'एक मराठा लाख मराठा, मिळेल अनुदान तरच मतदान' असे लिहिले असल्याची माहिती आहे.
Leave a comment