शिवसेनेनं अजानच्या स्पर्धा जाहीर करणं म्हणजे हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे. अजान आता शिवसेनेला गोड वाटू लागलं आहे. ओवेसींनाही लाज वाटेल इतके धर्मनिरपेक्ष आता शिवसेनाझाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व तर त्यांनी केव्हाच सोडलं होतं. आता साधं हिंदुत्वही शिवसेनेला मान्य नाहीये, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मुंबई --
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपकडून सेनेवर हिंदुत्ववादावरून बरीच टीका झाली. तर दुसरीकडे आता दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या नेत्याकडून अजान स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.
दक्षिण मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या स्पर्धेचं आयोजन केले आहे. अजान स्पर्धेचं आयोजन हे शिवसेनेनं केलं नसून फाऊंडेशन फाँर यू या संस्थेनं केले आहे, असं पांडुरंग सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. या संस्थेनं शिवसेनेकडे आयोजनासंदर्भात शुभेच्छा मागितल्या होत्या, त्या फक्त आम्ही दिल्या, असं स्पष्टीकरण पांडुरंग सकपाळ यांनी दिले.
दरम्यान, 'मुस्लिमांमधील लहान मुलं चांगली बोलतात तर त्यांचा अजान स्पर्धा का घेऊ नये' असं वक्तव्यही पांडुरंग सकपाळ यांनी केलं आहे. ही अजान स्पर्धा घेतली तर त्या स्पर्धेत जिंकणाऱ्या स्पर्धकांना शिवसेना पारितोषिक देईल,असंही सपकाळ यांनी सांगितले होते.
'प्रत्येक धर्मात अमन शांतीचा संदेश दिला आहे. महाआरती प्रमाणे अजान असते. त्यामुळे त्यावर वाद निर्माण करण उचित वाटत नाही', असंही सपकाळ म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन करण्यावरून भाजपने टीका केली आहे. या पुढे दसरा मेळाव्यानंतर 'नारा ए तकबीर... अल्ला हू अकबर' च्या घोषणा ऐकू येणार बहुतेक अशी खोचक टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
तर आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करून सेनेवर टीका केली आहे. 'आम्हाला मंदिरांत घंटा बडवणारा हिंदु नको तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदु हवा. आणि हो कोणीही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, ते सोडून आता आम्हाला 1 वर्ष झाले आहे' असा खोचक टोला ही भोसले यांनी लगावला.
Leave a comment