आष्टी । रघुनाथ कर्डीले
आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे दि.24 रोजी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या नागनाथ गर्जे या शेतकर्यांवर बिबट्याने हल्ला चढवल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शुक्रवारी दि.27 दुपारी स्वराज सुनील भापकर हा मुलगा काकासोबत शेतात गेला होता.यावेळी स्वराज्य वर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. यानंतर वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू केली मात्र तब्बल चार दिवस होऊनही बिबट्याने वनविभागाच्या अधिकार्यांना व त्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजरा ला गुंगारा दिला आहे त्यामुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दहशत आजही कायम आहे.
सुरुडी येथील घटनेला चार दिवस उलटून गेले तरीही बिबट्या पकडण्यात वन विभागाला यश आले नाही.वनविभागाने ठीक ठिकाणी पिंजरे बसवले असून ड्रोन कॅमेरा द्वारे शोध घेतला जात आहे तसेच अमरावती नाशिक औरंगाबाद जालना बीड इत्यादी ठिकाणाहून तज्ञ लोकांचे पथके या ठिकाणी तैनात आहेत. तब्बल 150 कर्मचारी व अधिकारी त्या नरभक्षक बिबट्याच्या पाळतीवर असून बिबट्याने मात्र या सर्व पथकास व अधिकार्यांना गुंगारा देण्यात यश मिळवले आहे. बिबट्या सापडत नसल्याने सुरुडी व किन्ही परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेर निघावा तर बिबट्याची दहशत घरात बसावं तर शेतीतील कामे कोण करणार ?? असा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे.शनिवारी सुरडी परिसरामध्ये आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता तेथील परिस्थिती भयानक असल्याचे चित्र समोर आले. शेतीला पाणी देताना एक जण शेतीला पाणी देतो तर दुसरा त्याच्या आजूबाजूला बिबट्या येतोय का त्याच्यावर पाळत ठेवून असतो. तसेच ग्रामीण भागांमध्ये जनावरांचा गोठा हा बंदिस्त नाही. गोठा बंदिस्त नसल्यामुळे जनावरांवर वर हल्ला करेल या भीतीने जनावराच्या गोठ्याजवळ एक जणाला काठी घेऊन उभा राहावे लागत आहे. महिलावर्ग व लहान बालकेही घरातच बसून आहेत शेतामध्ये जाण्याची कुणीही धाडस करीत नाही. गावामध्ये वन अधिकार्यांचा ताफा आला की ग्रामस्थ त्यांच्यासमोर अहो साहेब बिबट्याला पकडा हो अशी याचना करीत आहेत.
शनिवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास नगर बीड रोड वर असणार्या शेरी बुद्रुक या गावामध्ये शेतकर्यांना बिबट्या झाडावर असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले तोपर्यंत बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला होता बिबट्या शेतकर्यांना दिसतो पण वनाधिकार्यांना दिसत नाही अशी चर्चा नागरिकांमधून ऐकावयास मिळाली शेरी बुद्रुक या ठिकाणी तात्काळ पिंजरा बसवण्यात आला आहे. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी औरंगाबाद, नांदेड, अमरावतीसह बीड जिल्ह्यातील वन विभागाच्या वेगवेगळ्या पथकाने शोध मोहीम गतीमान केली असून भयभीत झालेल्या नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत बिबट्याला 24 तासात जेरबंद करण्याच्या इराद्याने सर्वजण कामाला लागले आहेत.दरम्यान वनविभागाने तात्काळ राज्यातील तज्ञ लोकांना बोलावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी सुरुडीचे सरपंच अशोक गर्जे यांनी केली आहे.
भापकर कुटुंबियांना 25 लाखाची मदत करा-काकडे
आष्टी तालुक्यातील किन्ही येथे मामाच्या गावाकडे आलेल्या स्वराज भापकर यांच्यावर शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी बिबट्याने हल्ला करून त्यास ठार केले आहे. शनिवारी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कीन्ही गावास भेट दिली या प्रसंगी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी गावच्या वतीने आणि सरपंच परिषदेच्या वतीने धनंजय मुंडे यांना सरपंच परिषदेचे निवेदन देऊन स्वराज भापकर च्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असून त्याच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत करण्याची मागणी केली.
Leave a comment