बीडमधील खळबळजनक घटना
पाटबंधारे अन् भूमि अभिलेखचा निष्काळजी कारभार चव्हाट्यावर
बीड । वार्ताहर
कर्मचारी वसाहतीसाठी जमिन संपादित करुन वर्षे लोटले, मात्र अधिकची जमिन संपादीत करत त्याचा मावेजा दिला नाही असा आरोप करत बीड तालुक्यातील पाली येथील एका तरुण शेतकर्याने थेट बीडच्या पाटबंधारे कार्यालयासमोर येवून पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. क्षणार्धात त्याच्या अंगावरील कपड्याने पेट घेतला. मंगळवारी (दि.24) भरदिवसा 12.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तो शेतकरी 84 टक्के भाजला गेला परंतु, उपचारादरम्यान, मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.. शिवाय भूमिअभिलेख व पाटबंधारे कार्यालयाच्या सावळा गोंधळ यामुळे समोर आला आहे.
अर्जुन कुंडलिक साळुंके (35, रा.पालीता.बीड) असे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. सन 1956 मध्ये पाली येथे बिंदुसरा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यासाठी प्रकल्पालगतच कर्मचारी वसाहतीसाठी सर्वे क्र.91, 111, 118 मधील दोन हेक्टर सहा आर जमीन पाटबंधारे विभागातर्फे संपादित केली होती. यामध्ये अर्जुन साळुंके यांच्या आई राधाबाई कुंडलिक साळुंके यांच्या 34 गुंठे जमिनीचा समावेश होता. तेंव्हा त्यांना 34 गुंठ्याचा मावेजाही दिला होता. मात्र, त्यांच्या मूळ सातबारा नोंदीवर 34 ऐवजी 44 गुंठे जमीन संपादित केल्याची नोंद झाली. ही बाब अनेक वर्षे साळुंके कुटुंबियांच्या निदर्शनास आली नाही. या दरम्यान राधाबाई यांचे पती कुंडलिक साळुंके यांचे निधन झाले.
त्यानंतर 2005 मध्ये संपादित क्षेत्रापेक्षा 10 गुंठे जादा जमीन सातबारा नोंदीवरुन कमी झाल्याची बाब निदर्शनास आल्यावर राधाबाई व अर्जुन या मायलेकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला. मात्र, अद्यापही त्यांच्या सातबारा व फेरफारवर दुरुस्ती झाली नाही व संपादित क्षेत्रापेक्षा दहा गुंठे जादा सातबारा नोंदीवरुन कमी होऊनही त्याचा मावेजाही मिळाला नाही. पाटबंधारे, भूमिअभिलेख ते आयुक्त कार्यालयापर्यंत अर्जफाटे करुनही न्याय न मिळाल्याने अर्जुन साळुंके यांनी 13 ऑक्टोबर 2020 रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवून पाटबंधारे कार्यालयासमोर 16 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याउपरही योग्य ती कार्यवाही न झाल्याने अखेर मंगळवारी (दि.24) अर्जुन साळुंके यांनी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा रुग्णालयासमोरील पाटबंधारे कार्यालयात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. सुरक्षारक्षकासह इतर कर्मचार्यांनी त्यांच्या अंगावर पोते टाकून आग विझविली. यामध्ये त्यांचे संपूर्ण शरीर होरपळून निघाले आहे.घटनेनंतर शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिका पाचारण करण्यात आली. अर्जुन साळुंके यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, उपचारादरम्यान, मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
भूमिअभिलेखवाले म्हणाले, आमचा हलगर्जीपणा नाही
संबंधित शेतकर्याची दहा गुंठे जमिनीची संपादित क्षेत्रामध्ये नोंद झाली नव्हती. यासंदर्भातील सर्व जुने दस्ताऐवज तपासण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या विनंतीनुसार 2018 मध्ये मोजणी करुन अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर केलेला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात दाखल आहे. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत पुढील कारवाई करता येणे शक्य नाही. आमच्या कार्यालयाचा हलगर्जीपणा म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक शेखर कापसे यांनी व्यक्त केली.
प्रकरण जुनेे;जमिन मोजणी झालेली नाही-वानखेडे
याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू.व्ही. वानखेडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हे प्रकरण फार पूर्वीचे आहे. शेतकर्याच्या अर्जानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयावर तीनवेळा बैठक झाली. उपविभागीय अधिकार्यांसमोरही प्रकरणाची संपूर्ण हकीगत मांडलेली आहे. भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करुन अहवाल मागविला आहे. त्यासाठी नोव्हेंबर 2018 व सप्टेंबर 2020 मध्ये प्रत्येकी बारा हजार व तीन हजार रुपये नोंदणी शुल्क भरलेले आहे. मात्र, अद्याप मोजणी झालेली नाही.
शेतकर्याने निवेदनातून मांडली व्यथा
शेतकरी अर्जुन साळुंके यांनी त्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेल्या निवेदनातून मांडली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, पंधरा वर्षांपासून यासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मागील चार वर्षांत आई राधाबाईने अनेकदा आत्मदहनाचा इशारा दिला. 2016 मध्ये मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. चार वर्षांत आईला चारवेळा पोलिसांनी अटक केली.यासाठी 90 लाखांची जमीन केवळ 8 लाखांत विक्री करावी लागली. त्यामुळे प्रचंड आर्थिक व मानसिक नुकसान झाले.2 मे 2020 रोजी अपघातात आईचे निधन झाले. डोक्यावर कर्ज झाले. दुसरीकडे बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली.अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळानेही कर्ज मंजूर केले नाही. त्यामुळे आत्मदहनाशिवाय पर्याय नाही.
दोषींवर कार्यवाही करा-आ.संदीप क्षीरसागर
या घटनेला जबाबदार असणार्या दोषींवर कार्यवाही करावी अशा सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.पाली येथील शेतकर्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर आ.क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत उपचार घेत असलेल्या शेतकर्यासह कुटुंबियाची भेट घेतली.यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे यांच्याशी संवाद साधला.
Leave a comment