मुंबई :
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी हे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले तरी मुंबईतील शाळा आता नवीन वर्षातच सुरु होण्याची शक्यता आहे. डिसेंबरनंतर पुढील शैक्षणिक वर्ष कसं सुरु करता येईल याचा रोडमॅप तयार करता येईल याचा विचार मुंबई महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग करत आहे.
यापूर्वी शाळांबाबत राज्य सरकारने वेगळे आदेश पारित केले होते. मात्र मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या 31 डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असा निर्णय घेतला.
राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.
मार्च महिन्यापासून राज्यातली शाळा कॉलेजेस बंद असून Online अभ्यास सुरू आहे. दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढवणं मुंबई महापालिकेसाठी गरजेचं आहे. या संभाव्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याची तारीख पुढे ढकलल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, "बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता लक्षात घेता 31 डिसेंबरपर्यंत कोणतीही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहेच, शिवाय मुंबई महापालिकेला तयारीसाठी वेळ मिळावा ही देखील त्यामागील भूमिका आहे. मुंबई महापालिकेने कोविड सेंटर म्हणून शाळा ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे शाळांचं सॅनिटायझेशन होणं गरजेचं आहे. आता हळूहळू या सेंटरची संख्या कमी केलेली आहे. अजून अनेक शाळांचं सॅनिटायझेशन झालेलं नाही. त्यामुळे तेवढा कालावधी मिळणं हे प्रशासनासाठी गरजेचं आहे."
शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार! - वर्षा गायकवाड
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी आँनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
पुण्यात 43 शाळा सुरू करण्याची तयारी
दरम्यान, पुणे महापालिकेकडून राज्यशासनाच्या आदेशानुसार, माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वीच धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठ येथील उर्दू शाळेच्या शिक्षकास कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown?
Coronavirus च्या नव्या रुग्णांचा आलेख गेले काही दिवस महाराष्ट्रात सातत्याने घसरत होता. त्यामुळे दिलासा मिळत असतानाच गेल्या दोन दिवसात चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. Covid-19 चे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला लागले आहेत. कोरोना मृत्यूंची संख्याही वाढते आहे. त्यामुळे शेजारच्या गुजरात राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा कर्फ्यू लागू केला, तसा महाराष्ट्रातही करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
Leave a comment