जयदत्त क्षीरसागरांच्या नियुक्तीकडे जिल्ह्याचे लक्ष
बीड । वार्ताहर
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा जागांसाठी गेल्या पंधरा दिवसापासून सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू असून कोणाला संधी द्याची यावरून शह काट शहाचे राजकारण सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेवून राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मार्ग मोकळा केला आहे. सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षामुळे या नियुक्तया जवळपास पाच महिन्यापासुन रखडल्या आहेत. सुरूवातीला कोरोना आणि नंतर राज्यपाल -सरकार मधील संघर्ष या कारणाने अनेक इच्छूकांच्या नजरा यादीकडे लागून राहिल्या आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातुन शिवसेनेकडून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि काँग्रेसकडून रजनीताई पाटील यांना आमदारकी मिळू शकते अशी जोरात चर्चा आहे मात्र त्या संदर्भात अधिकृत माहिती नियुक्ती झाल्यावरच कळणार आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या बद्दल कमालीची गुप्तता पाळली आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे नाव यादीत येईल या आशेने जिल्हा वासियांने लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर वेगवेगळ्या कारणावरून सरकार आणि राज्यपाल याच्या मतभेदाची दरी सातत्याने वाढत चालली आहे. मंदिरे उघडण्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रानंतर मोठे वादंग निर्माण झाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखिल ठाकरे शैलीत राज्यपालांना उत्तर दिले. दिल्लीहुन यामध्ये हस्तक्षेप झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे शांत झाल्याचे चित्र आहे.मंत्री मंडळाने गेल्याच आठवड्यात बारा जागा राज्यपालांकडे पाठवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. काँग्रेसकडून बंद लिफाफ्यात यादी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सुपृर्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची यादी मात्र अद्याप अंतिम झालेली नाही. मराठवाड्यातून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर या दोघांच्या नावाची चर्चा गेल्या आठ दिवसापासून चालू आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सातत्याने मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले आहे अशी शिवसेनीकांची भावना आहे. मराठवाड्यात ताकद वाढवण्यासाठी एखाद्या नेत्याला संधी देणे गरजेचे आहे. विधान सभेत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा अल्पशा मताने पराभव झाल्याने त्यांचे मंत्री पद हुकले ते सत्तेत असल्याशिवाय जिल्ह्यात विकासाची कामे होत नाहीत. हे वर्षे भरातच जिल्ह्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. बीडमध्ये तर ज्यांनी विरोध केला ते देखिल जयदत्त क्षीरसागर सत्तेत असायलाच हवेत अशी भावना व्यक्त करून दाखवत आहेत. केवळ बीड मतदार संघाचेच नव्हे तर जिल्ह्याचे प्रश्न आणि त्याच बरोबर मराठवाड्यातील काही महत्वाचे प्रश्न देखिल क्षीरसागरांनी गेल्या पाच दहा वर्षात मोठ्या प्रमाणात मार्गी लावले आहेत. आता विधान परिषदेशिवाय त्यांना दुसरी संधी नाही. त्यांची एकंदरीत राजकीय प्रतिमा पाहून, राजकारणातील अभ्यास पाहून आणि ओबीसी म्हणून त्यांना शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे संधी देतील असा विश्वास त्याचे समर्थक आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांना वाटत आहे. मराठवाड्यातील बहुतेक जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकार्यांनी जयदत्त क्षीरसागरांना संधी द्यावी अशी विनंती पक्ष नेतृत्वाकडे केलेली आहे. येत्या आठवडा भरात या बारा जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ बीडकरांचेच नव्हे अवघ्या जिल्हा वासीयांचे आणि मराठवाड्यातील जनतेचे नियुक्त यादीकडे लक्ष लागले आहे.
माध्यमामध्ये विनाकारण चर्चा
मुंबईत काही प्रसार माध्यमांकडून मनाला वाटेल त्या नावांची चर्चा बातम्यांमधून केली जात आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसची आमदारकीची ऑफर नाकारल्यानंतर शिवसेनेने तिला ऑफर दिल्याच्या बातम्या दोन दिवसापासून चालू आहेत. एवढेच नव्हे तर सुरूवातीला रेणूका शहाणे यांचे राष्ट्रवादीकडून चर्चेत होते. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशही झाला. त्यानंतर काल शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांचेही नाव चर्चेत आहे. राजकीय नेत्यांची नावे तर विचारायलाही नको. अधिकृत कुठलीच माहिती नसतांना मुंबईत बसून ज्या बातम्या रंगवल्या जात आहेत. त्यामुळे विनाकारण चर्चा होत आहे.
रजनीताईंनाही संधी
जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्या रजनीताई पाटील यांची राज्य सभेवरच नियुक्ती होणार होती मात्र एैन वेळी राजीव सातव यांचे नाव पुढे आल्याने त्यावेळी रजनीताईना माघार घ्यावी लागली. आता विधान परिषदेच्या नियुक्त आमदारांमध्ये काँग्रेस कडून त्यांना संधी दिली जाण्याची मोठी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची यादी हाय कमांड कडून फायनल करून मुख्यमंत्र्याकडे बंद लिफाफ्यात दिली आहे. रजनीताई पाटील यांना संधी मिळू शकते असे राजकीय वर्तृळात बोलले जात आहे.
Leave a comment