हाथरस --
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पायी चालत निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं आणि राहुल गांधी यांना अटक केली.
तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी अटकेपूर्वी पोलिसांना केला होता. परंतु कलम 144 लागू असल्याने आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही, असं उत्तर पोलिसांनी त्यांना दिलं. यानंतर काही वेळाने राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली.
हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरत आहे. आज हाथरस येथे 144 कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याने तेथे कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली होती. देशभरातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
हाथरस येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे व पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते व नेतेही होते. मात्र अशाही परिस्थितीत राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले...'कितीही झालं तरी मी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही', असे ते यावेळी पोलिसांना सांगत होते. या धक्काबुक्कीत मोठा जमाव येथे उपस्थित होता. त्यांच्या या धक्काबुक्कीची व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
हाथरस येथे काही दिवसांपूर्वी एक मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. यामध्ये मुलीची जीभ कापण्यात आली होती व शिवाय तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचीही माहिती समोर आली होती. उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांची परवानही न घेता त्या मुलीवर रात्री 2.30 च्या दरम्यान पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याचे समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला. देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. आणि पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस सरकारनेही योगी सरकारच्या या कारवाईवर संताप व्यक्त करीत राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान ते आज पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी हाथरस येथे
गेले होते.
'ये देखो आज का हिंदुस्तान'
यावेळी राहुल गांधींनी मी एकटा जाणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तर त्यांंना धक्काबुक्की केली. यामध्ये राहुल गांधींची कॉलर पकडण्यात आली व ते खाली पडले. यादरम्यान राहुल गांधी मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नसल्याचं सांगत होते. यावेळी सुरू असलेल्या गदारोळात 'ये देखो आज का हिंदुस्तान' असं ते समाजमाध्यमांना सांगत होते.
Leave a comment