'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है',
मुंबई । वार्ताहर
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरून देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे. या विधेयकाला महाविकास आघाडी सरकारनेही विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केली होती. पण, दुसरीकडे भाजपचे नेते नितेश राणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात संभ्रम निर्माण केला आहे.
कृषी विधेयक जेव्हा राज्यसभेत सादर करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थितीत केला होता. त्यांच्या प्रश्नाची री ओढत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत 'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है' असं विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
तसंच, 'केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकरी सुरक्षित आहे', असंही नितेश राणे म्हणाले.
तसंच, 'राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेत हजर होते. त्यावेळी ते कृषी विधेयकावर बोलले सुद्धा, पण त्यांनी कोणताही विरोध केला नाही. फक्त सभात्याग केला होता', असा दावाही राणेंनी केला.
विशेष म्हणजे, शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कृषी विधेयकावर राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली होती. कृषी विधेयकावर चर्चा करणे गरजेचं होतं. पण मोदी सरकारने घाई-घाईने हे विधेयक राज्यसभेत मांडले, अशी टीका पवारांनी केली होती.
ज्या दिवशी हे विधेयक राज्यसभेत सादर झाले होते. त्या दिवशी शरद पवार हे मुंबईत होते. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीला हजर राहणे गरजेचं होतं. त्यामुळे आपण दिल्लीला जावू शकलो नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.
Leave a comment