कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई । वार्ताहर
राज्यात आता कुठेही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घालण्यात आली आहे.राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.त्यामुळे आता आरोग्य विभागाने हा आदेश जारी केला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, राज्यात सुट्टी सिगारेट आणि बिडीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी हा निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या होत्या. मात्र, यावर निर्णय होऊ शकला नव्हता. यासाठी विधी व कायदा विभागासह सरकारकडे आरोग्य विभागाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय विधी विभागाकडून देण्यात आला नव्हता.सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) नुसार सिगारेटच्या पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे बंधनाकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट हे आरोग्यास धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला. पण, आता अनेक पानटपर्यांवर सिगारेटच्या पाकिटातून एक-एक सिगारेटची आणि बिडीची विक्री केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी सुट्टी सिगारेट आणि बिडी विक्रीवर बंदी आणावी असा प्रस्ताव आरोग्य विभागाने विधी व न्या विभागाकडे पाठवला. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
विशेष म्हणजे, अनेक राज्यात असा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा राज्यात असा निर्णय व्हावा यासाठी आग्रही होते. त्यामुळे आता सर्व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर 24 सप्टेंबरपासूच राज्याती कोणत्याही पान-बिडी शॉप किंवा दुकानांवर यापुढे सुटी सिगारेट किंवा बिडी विकता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.जर सिगारेट किंवा बिडी विकत घ्यायची असेल तर यापुढे संपूर्ण पाकिटच खरेदी करावे लागणार आहे. मुळात सिगारेटच्या आहारी गेलेल्या तरुणाईला व्यसनांपासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी म्हटले आहे.
व्यसन कमी करण्यासाठी पाऊल
राज्यात महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, एक किंवा दोन अशा सुट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत तर तरुणाई तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन जाणार नाही,असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.
Leave a comment