राज्यात ऑक्सिजनचे बेड वाढवा
केंद्र सरकारचे राज्याला आदेश
मुंबई (वृत्तसेवा)
महाराष्ट्रात वेगाने वाढणार्या करोना रुग्णांमुळे केंद्र सरकार चिंतीत झाले आहे. केंद्र सरकारने यासाठी पुढील महिन्यात 13 ऑक्टोबरपर्यंत किती रुग्ण वाढतील याचा अंदाज बांधून राज्यातील रुग्णालयांत ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलटरचे 7 हजार 355 बेड वाढविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पुढील महिन्यात वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन पुरेशा बेडची व्यवस्था न केल्यास करोना रुग्णांचे बेड अभावी अतोनात हाल होतील तसेच मृत्यूंची संख्याही वाढेल अशी भीती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
राज्यात आगामी महिन्यात म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत किती करोना रुग्ण वाढतील व त्यातुलनेत नेमक्या किती ऑक्सिजन बेडची, अतिदक्षता विभागातील बेड तसेच व्हेंटिलेटर लागतील याचा सखोल अभ्यास करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात नेमकी किती अतिरिक्त बेडची व्यवस्था करायला हवी याबाबत स्पष्ट सूचना राज्य सरकारला केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आजघडीला असलेले करोना रुग्ण आणि 13 ऑक्टोबर रोजी असणारे रुग्ण यांचे गणितच केंद्र सरकारने मांडले आहे. हे गणित मांडताना आजघडीला राज्यात रोज होणार्या चाचण्यांचा विचार करण्यात आला असून करोना चाचण्यांची संख्या वेगाने वाढविण्यासही केंद्राने यापूर्वीच सांगितले आहे. देशपातळीवरील अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण खूपच कमी असून दहा लाख लोकांमागे रोज 383 चाचण्या करण्यात येत आहे. राज्यातील शासकीय करोना चाचणी प्रयोगशाळा या पूर्ण क्षमतेने चाचण्या करत नसून यासाठी ठोस पावले टाकण्यास केंद्र सरकारने बजावले आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात रोज 20 ते 24 हजाराने करोना रुग्णांची वाढ होत आहे. आजच्या दिवशी राज्यात 12 लाख 47 हजार 284 करोना रुग्णसंख्या असून आतापर्यंत 33 हजार 407 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात असलेल्या करोना रुग्णांची जिल्हावार आकडेवारी व रुग्णालयातील बेडची संख्या तसेच 13 ऑक्टोबर रोजी नेमके जिल्हावार किती रुग्णसंख्या असेल व त्यासाठी ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरचे किती बेड लागतील याची सुस्पष्ट कल्पना केंद्र सरकारने राज्याला दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात 10 लाख 11 हजार 404 करोना रुग्ण होते. ते 13 ऑक्टोबर रोजी 16 लाख 96 हजार 991 रुग्ण झालेले असतील. आजच्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर रोजी राज्यात 12 लाख 62 हजार रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने महाराष्ट्रात वाढणार्या रुग्णांबाबत दिलेली माहिती योग्य दिसते, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्याने सांगितले. याचा विचार करता महाराष्ट्रात पुढील महिन्यात रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेडची व्यवस्था करावी लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयात मिळून 13 सप्टेंबर रोजी 56 हजार 356 ऑक्सिजन बेड, अतिदक्षता विभागात 18 हजार 785 बेड तर 9 हजार 398 व्हेंटिलेटर उपलब्ध होते. 13 ऑक्टोबरपर्यंत जवळपास सहा लाखाहून अधिक वाढणारे करोना रुग्ण लक्षात घेता यात 7 हजार 355 बेडची वाढ करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. किमान अतिदक्षता विभागात 4 हजार 385 बेड, 2 हजार 584 व्हेंटिलेटर बेड व चारशे ऑक्सिजन बेड वाढविण्यास सांगण्यात आले आहे.
Leave a comment