मुंबई | वार्ताहर
मुंबईतील इंदू मिलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला होता. पण, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये धुसफूस आणि निमंत्रणावरून नाराजी नाट्यानंतर अखेर हा कार्यक्रमच अनिश्चित काळासाठी कार्यक्रम रद्द केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यास समोर बोलून दाखवली. इंदू मिल कार्यक्रम यावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी होती. त्यामुळे इंदू मिल पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला? अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ नको म्हणून तुर्तास कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढावली.
दरम्यान, त्याआधी या कार्यक्रमाला मोजक्यात 16 जणांना बोलावण्यात आले होते. पण, इंदु मिलसाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर यानांही आमंत्रित करण्यात आले नव्हते. सरकारने बाबासाहेबांच्या कुटुंबातील सदस्यांनाच आमंत्रित न केल्यामुळे तीव्र नाराजी उमटली होती.
अखेर सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास एमएमआरडीएकडून एक पत्रक प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. निमंत्रण मिळाल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी पायाभरणीच्या कार्यक्रमास जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
तरदुसरीकडे, विरोधी पक्षांनेत्यांनाही या कार्यक्रमाची माहिती आणि निमंत्रण देण्यात आली नव्हती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्याची माहिती समोर आली. दोघेही नेते मुंबईत असून निमंत्रण देण्यात आले नव्हते. तर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, स्मारक पुतळा पायाभरणी कार्यक्रमाचे अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. मात्र कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे की त्यांनी अटलबिहारी वाजपेयींची इंदू मिलच्या जागेबाबत जी नोट आहे तिचे प्रथम अध्ययन करावे. तसेच वाजपेयींना नेमके काय अपेक्षित होतं ते ठाकरेंनी बघावे आणि त्यासाठी पुढाकार घ्यावा. स्मारकाच्या आराखड्याबाबत सुरूवातीपासूनच माझा आक्षेप आहे. तरीही मला कोणावर ही आरोप करायचे नाहीत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला अशा कार्यक्रमांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. इंदू मिल येथील स्मारकाला माझा विरोध कायम आहे अन् हे मी तिथे जाऊन बोलेल असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोणकोणत्या नेत्यांना निमंत्रण होतं?
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसून मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, नगरसेवक आणि अधिकारी यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु अखेरच्या क्षणी आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं.
कार्यक्रम पुढे ढकलला हे चांगलंच झालं : आनंदराज आंबेडकर
कार्यक्रम पुढे ढकलला हे चांगलच झालंच, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. राज्यात सध्या जे वातावरण आहे, ते पाहता असे सोहळे करणं योग्य नाही. दोन्ही समाजांमध्ये वाद नको अशी माझी मानसिकता होती. एमएमआरडीएला उशिरा सुचलेलं शहाणपण असं याचं वर्णन करता येईल, असं आनंदराज आंबेडकर म्हणाले.
इंदू मिलच्या जागेवर स्मारकाऐवजी लोकपयोगी वास्तू उभी करा, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. याविषयी आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालंच पाहिजे, अशी आमची मागणी आहे."
राजकारण करू नये मुख्यमंत्र्यांचे आवाहन
इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे
...अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला यु-टर्न; वाशीहून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम एमएमआरडीएने अचानक रद्द केला. इंदू मिल येथील राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पायाभरणीचा कार्यक्रम होणार होता. मात्र निमंत्रणावरुन झालेल्या वादातून हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाल्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसला.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अजितदादा पुण्याहून मुंबईसाठी येत होते. दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती MMRDA ने दिली. त्यामुळे वाशीपर्यंत पोहचलेले अजित पवार पुन्हा यु-टर्न घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
Leave a comment