-
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, आंदोलन न करण्याचे केले आवाहन
बीड । वार्ताहर
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर मराठा समाजाला आवाहन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार मराठा आरक्षणासोबत असून आंदोलन करू नका, अफवांना बळी पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने पूर्ण ताकदीने बाजू मांडली आहे. पण मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. आत जी गरजेची स्थगिती नव्हती, ती देण्यात आली आहे हे अनाकलनिय आहे, असं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
'सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहे. ज्या मराठा संघटना आहे, जी लोकं आहे त्यांच्याशी बोलत आहे. अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांशी बोलणे सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सरकारसोबत आहोत अशी ग्वाही फडणवीसांनी दिली' अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.
'मराठा आरक्षणाची तुमची जी भावना आहे, तीच आमचीही भावना आहे. तुमच्या मागण्या या राज्य सरकारच्या मागण्या आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार कोर्टात लढा देत आहे. मराठा समाजाच्या सर्व सुचनांचा विचार करून रणनीती आखत आहे. सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आंदोलन काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देणे यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठा समाजाने अफवांना बळी पडू नये, कुणाच्या बोलण्यात येऊ नये. गैरसमज पसरवू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.
महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याबद्दल बोलणार आहे. मुख्यमंत्रिपदी असल्यामुळे कधीही काहीही करता येत नाही. बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडे उत्तर नाहीत असे नाही. 'पुनश्च हरिओम' म्हणजे पुन्हा राजकारण असा त्याचा अर्थ नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.
करोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपले मत मांडत आहेत. ते आज राज्यातील जनतेशी सोशल मीडियावरून संवाद साधत आहेत. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम अनेकांकडून सुरू आहे, मुख्यमंत्री घरी बसून अराम करत आहेत असा आरोप केला जात आहे. मात्र मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याच्या दुर्गम भागापर्यंत पोहचत आहे. तेथील अधिका-यांशी संवाद साधत आहे, असे सांगून विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ आहे. पण, याही परिस्थितीत सरकार खंबीर आहे.
- जागतिक संघटनेनं इशारा दिला आहे, कोरोनाची लाट येणार आहे. त्यामुळे सतर्क राहिले पाहिजे
- महाराष्ट्रात येत्या १५ तारखेपासून मोहिम राबवतोय. या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी जात धर्म हे सोडून सहभागी झाले पाहिजे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करत आहोत.
- सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे लागणार आहे.
- १२ कोटी जनतेची आरोग्य तपासणी करणे, जरा अवघड काम आहे. पण तरीही प्रत्येक घराची दोनदा चौकशी करण्यासाठी राज्य सरकारची टीम येईल. जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी जबाबदारी घ्यावी
- घराघरात जाऊन ५० ते ५५ वयापेक्षा जास्त व्यक्तींची ऑक्सिजन लेव्हल तपासणार आहे, यात काही दोष आढळून आला तर आरोग्य टीम इलाज सुरू करेल.
- सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे
- घरी आल्यावर बुट बाहेर काढणे, हात-पाय धुणे, कपडे बाहेर काढून ठेवणे आणि त्यानंतर घरात प्रवेश करावा
- समोरासमोर बोलण्याचे टाळा, मास्कचा वापर करा
- लोकल सेवा सुरू केली आहे, त्यात लवकरच वाढ करणार आहोत,
- जिम रेस्टॉरंट, लवकरच सुरू करणार आहोत.
- मी घरीच बसून काम करतोय, असा आरोप होतोय. पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे. त्या लोकांशी बोलणे गरजेच आहे. ते काम मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करत आहे. आणि काम होत आहे. आरोप करून काहीही फायदा नाही.
- इतरांसमोर जेवताना समोरासमोर बसून जेवू नका, जेवताना छोट्या छोट्या वाट्या घ्या..
- पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येऊ देऊ नका, लोकांनी सर्व नियम पाळले तर लॉकडाउन परत करण्याचे वेळ येणार नाही ही अपेक्षा ठेवतो.
- हे संकट शेवटचं असेल असं नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण लढा देतोय
Leave a comment