मुंबई । वार्ताहर
काय म्हणताहेत राज्याचे मुख्यमंत्री ऐका
Facebook: https://bit.ly/2TZbpTX
Insta: https://www.instagram.com/cmomaharashtra_/
Twitter: @CMOMaharashtra
राज्यात सध्या कोरोनाचा धोका असताना अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. एकूण संपूर्ण परस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 1 वाजता समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे यावेळी ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
खरंतर, राज्यात रोज कोरोनाचे मोठ्या संख्येनं रुग्ण वाढत आहेत. अशात आरोग्य व्यवस्था डगमगली आहे. त्यामुळे कोरोनाला आवर कसा घालायचा असा महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. त्याहून पलीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक पेटून उठले आहेत. कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर भाजपकडून वारंवार ठाकरे सरकारला टार्गेट केलं जात आहे. त्यावर आज उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम राबवण्याबाबत जाहीर केलं होतं. त्याबाबत देखील मुख्यमंत्री आज बोलू शकतात.
'"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" कार्यक्रमात सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर आपण संकटापासून सुरक्षित राहू व जनतेला सुरक्षित ठेऊ. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.
१५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे. आरोग्य सेवक, महसूल यंत्रणा, नगरपालिका, महापालिका, ज्या यंत्रणा आहेत त्यातील सगळी माणसे, त्यांनी प्रत्येक घरात जाऊन चौकशी करणार आहेत. ही जनजागृतीची मोहीम महाराष्ट्रामध्ये पहिल्या फेरीत २२ दिवस व दुसऱ्या फेरीत १२ दिवस होणार आहे. यामध्ये कुटुंबाच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, ते High Risk गटातील आहेत का, ज्येष्ठ नागरिक, इतर आजार असणाऱ्या व्यक्ती शोधण्यात येतील व आवश्यकतेनुसार आपण त्यांच्यावर इलाज करणार आहोत. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.
एकीकडे कोराना, मराठा आरक्षण आहेच तर दुसरीकडे कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. कंगनाने वारंवार ट्वीट करून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेमध्ये टीका केली. यावर शिवसेनेनंही सामनाच्या माध्यमातून टीका केली. पण कंगना प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा आदेश शिवसेना नेत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे यावर आज खुद्द मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
राज्यासमोर कोरोनाचे आव्हान
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या राज्यासमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. राज्यात राज्यात काल दिवसभरात २२ हजार ८४ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ३९१ मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ३७ हजार ७६५ झाली असून, मृतांचा आकडा २९ हजार ११५ एवढा आहे. राज्यात सध्या तब्बल २ लाख ७९ हजार ७६८ सक्रिय रुणांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री आपल्या संबोधनामधून राज्यातील जनतेला कोणते आवाहन करतात आणि प्रशासनाला कोणत्या सूचना करतात, हे पाहावे लागेल.
मराठा आरक्षणावर काय मांडणार भूमिका
राज्यातील मराठा समाजाला दिलेले शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीमुळे अडचणीत आले आहे. तसेच त्याविरोधात मराठा समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता आरक्षणाच्या मार्गात आलेला हा अडथळा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री कोणती भूमिका मांडतात याकडे मराठा समाजासह राज्यातील जनतेचे लक्ष असेल.
कंगना-शिवसेना वादावर प्रतिक्रिया देणार का
आज राज्यातील जनतेला संबोधित करताना सध्या गाजत असलेल्या कंगना- शिवसेना वादावर मुख्यमंत्री भाष्य करणार की त्याला बगल देणार याची चर्चाही सुरू झाली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर करण्यात आलेली टीका आणि अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईची केलेली पीओकेशी तुलना यानंतर शिवसेनेने मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे समोर आणला आहे. तसेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा चालवल्याने वाद अधिकच पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Leave a comment