सलग सहा महिने कोरोनाशी लढा देत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या तिघांनाही कोरोनाची लागण
नागपूर : -
नागपूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. मागील २४ तासांत नागपुरातील तीन पत्रकारांसह ५३ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फिल्डवर काम करताना सुरक्षेच्या सर्व बाबींचे पालन करीत सलग सहा महिने कोरोनाशी लढा देत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या तिघांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सागर जाधव, सुनील शेट्टी, नितीन पाचघरे अशी या तीनही पत्रकारांची नावे आहेत.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनामुळे मृत्यू होणार्या रूग्णांची संख्या दरदिवशी वाढतच आहे. नागपुरात मागील २४ तासांत तब्बल ५३ कोरोनाग्रस्त रूग्णांचे मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या मृत्यूमध्ये १० ग्रामीण भागातील, ३९ नागपूर शहरातील तर ४ मृत्यू जिल्ह्याबाहेरील झाले आहे.
कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १५६९ वर पोहोचली आहे. यामधील १२ जण हे नागपूर महापालिकेतील कर्मचारी आहेत. तर आत्तापर्यंत ९ पोलिस कर्मचार्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यासोबतच यात प्रसारमाध्यमांत काम करणार्या तिघांच्याही मृत्यूचा समावेश आहे.
मागील २४ तासांत नागपुरात २०६० नवे कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. नागपुरात चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दरदिवशी सरासरी २ हजार नव्या रूग्णांची भर पडत आहे. तर रूग्ण संख्येत दरदिवशी होणारी वाढ बघता नागपुरातील आरोग्यव्यवस्था कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे नागपुरात रूग्णांचे मृत्यू वाढत असल्याचा निष्कर्ष काढला जातोय. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ४८ हजार एवढी झाली आहे. तर आतापर्यंत ३५ हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १३ हजार क्रियाशील रूग्णांवर सध्या नागपुरात उपचार सुरू आहेत.
Leave a comment