छगन भुजबळ होम क्वारंटाईन
मुंबई -
कोरोनाचा शिरकाव मंत्रालयात झाला आहे. आतापर्यंत तीन मंत्री कार्यालयांतील कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने ती तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाचा यात समावेश आहे.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे कार्यालय सध्या हुतात्मा चौकात हलविण्यात आले आहे. येथील एचएसबी बॅंक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर महावितरणचे उपकार्यालय असून ऊर्जा खात्याचा कारभार सुरु आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून ऊर्जामंत्री दालन बंद आहे. सध्या या मंत्री दालनाची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती व फर्निचरची कामेही सुरू आहेत. या कार्यालयात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याचे समजते.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या कार्यालयातील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांपूर्वी हे कार्यालय संध्याकाळी घाईगडबडीने बंद करण्यात आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले. उदय सामंत सध्या मंत्रालयासमोरील आपल्या शासकीय निवासस्थानामधून खात्याचा कारभार पाहत आहेत.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.
कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाईन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.
Leave a comment