बीडमधील महाविद्यालयांना चांगले दिवस येणार
बीड । वार्ताहर
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील प्रादेशीत आरक्षण अर्थात 70-30 चा कोटा रद्द झाल्यामुळे मराठवाड्यालगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील संस्थाचालकांची दुकानदारी बंद झाली आहे. आता मराठवाड्यातील गुणवत्तेला यामुळे वाव मिळणार आहे. 70-30 कोटा रद्द करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून मराठवाड्यात आवाज उठवला जात होता. सरकारने हा निर्णय घेतल्याने गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मराठवाड्याच्या शेजारच्या नगर जिल्ह्यात असलेल्या संस्थाचालकांची दुकानदारी मात्र यामुळे बंद झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वैद्यकीय महाविद्यालय असल्याने मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी नगर जिल्ह्यातील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या गावांमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेवून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न पाहत होते. लातूरला शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी हे बार्शी व इतर तालुक्यांमध्ये असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेवून केवळ परिक्षेसाठी जात होते. बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या पाथर्डी, खरवंडी, खर्डा आदि गावात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत होते. यासाठी एक लाखापर्यंत फि आकारली जात होती. प्रात्यक्षिकाचे मार्क पैकीच्या पैकी देवून बारावीला गुणवत्ता यादीत आणण्याचे कंत्राट अनेक शिक्षण संस्थाचालक घेत होते. या कामात महाविद्यालयाचे प्राचार्यच पुढाकार घेवून मराठवाड्यातील जास्तीत जास्त प्रवेश कसे होतील? यासाठी प्रयत्न करत होते. आता 70-30 कोटा रद्द झाल्याने या महाविद्यालयाची आणि संस्थाचालकांची दुकानदारीच बंद झाली आहे. मराठवाड्यातील महाविद्यालयांना देखील यामुळे चांगले दिवस येणार आहे. बीड शहरातही अनेक नामांकीत संस्थांचे महाविद्यालये आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक पालकांनी पश्चिम महाराष्ट्रातील शाळांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले होते. मात्र आता ते प्रवेश रद्द होवून बीडमध्येच होण्याची शक्यता आहे.
Leave a comment