बीड । वार्ताहर
नगरपालिका निवडणूकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचार सभेसाठी बीडमध्ये येत आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये प्रथमच बीड नगरपालिका निवडणूकीत भाजपाने पुर्ण ताकदीनिशी उमेदवार उभे करुन सुसंस्कृत चेहरा नगराध्यक्षपदासाठी देवून बीड नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये अगदी गत नगरपालिकेच्या निवडणूकीपर्यंत भाजपाचे एक किंवा दोन नगरसेवक असायचे. बीड नगरपालिकेवर क्षीरसागरांची सातत्याने जवळपास 35 वर्ष सत्ता होती.मात्र यावेळी भाजपाचे कमळ शहरातील घरा-घरात पोहचविण्यामध्ये स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत. शरद पवार राष्ट्रवादी गट पक्षाचे चिन्ह तुतारी आणि भाजपाचे कमळ या दोघांमध्ये ही लढत आहे. तुतारीचा आवाज बंद करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये येत असून त्यांच्या सभेने बीडमध्ये भाजपासाठी नवा इतिहास रचला जाणार असल्याचा विश्वास भाजपातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. या निवडणूकीत दोन आठवड्यांपासून राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर यांनी कमळ फुलविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.निवडणूकीपूर्वी पंकजा मुंडेंनी बीडसह गेवराई, धारुर आणि माजलगावात लावलेली फिल्डिंगही यशस्वी होत असल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यासह शहरात राजकारणावर क्षीरसागर घराण्याचा कायम दबदबा राहिलेला आहे. तो आजही आहे. मागील दोन विधानसभा निवडणूकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर विजयी झाले आहेत. शहरात असलेला मतदार यावेळी मात्र नेमका काय निर्णय घेईल, अशी चर्चा असतानाच भाजपाने डॉ.ज्योती घुमरे सारखा स्वच्छ चेहरा आणि प्रभागात नवीन चेहरे देत भाजपाला बीडमध्ये पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बीडच्या एकंदरीत राजकीय आणि सामाजिक समीकरणांचा विचार केला तर बीड शहरात मुस्लिम समाजाचे मताधिक्य अधिक आहे. त्या पाठोपाठ भाजपाचा डीएनए समजला जाणारा ओबीसी वर्गही दुसर्या क्रमांकावर आहे. स्व.गोपीनाथ मुंडे आणि स्व.केशरकाकू क्षीरसागर यामुळेच या मतदारसंघांमध्ये सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग करत होते. यावेळी नगराध्यक्षपद मागासवर्गीयांसाठी आरक्षीत झाल्याने बीड शहराच्या राजकीय इतिहासात प्रथमच नगरपालिकेचा अध्यक्ष हा मागासवर्गीय प्रवर्गातील होणार आहे. स्व.केशरकाकू क्षीरसागरांपासून तर थेट जयदत्त क्षीरसागरांपर्यंत हा समाज कायम त्यांच्या पाठीशी राहिला आहे, मात्र राजकारणात नवी पिढी तयार झाली आणि राजकीय समीकरणांबरोबरच सामाजिक समीकरणही बदलत गेले. यावेळी याच समीकरणाचा फायदा भाजपाला होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. विजयपथापर्यंत कमळ येवून पोहचले आहे. त्याच्या गळ्यामध्ये विजयमाला घालण्याचा संकल्प भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी केला आहे. त्या संकल्पपूर्तीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजची बीडमधील पारसनगरी मैदानावरील सभा महत्वाची ठरणार आहे. दुपारी 12 वाजता ही सभा होत आहे.
मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीसांमुळे पंकजाताईंची संकल्पपूर्ती
जिल्ह्यात यापूर्वी केवळ गेवराई आणि धारुर नगरपालिकेमध्येच भाजपाची सत्ता होती. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीडमध्ये मात्र भाजपाचे कमळ कधीही फुलले नाही. लोकसभेत बीड विधानसभा मतदार संघ कायम भाजपाच्या पाठिशी राहिला. मात्र नगरपालिकेमध्ये सत्ता मिळवू शकला नाही. यावेळी मात्र मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सुरुवातीपासूनच बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले होते. भाजपाचे कमळ बीडमध्ये फुलविण्यासाठी त्यांनी मागील काही महिन्यांपासून कार्यकर्त्यांना कामाला लावले होते. बीड नगरपालिका पंकजाताईंच्या दृष्टीने महत्वाची होती, त्यामुळेच त्यांनी बीडमध्ये कमळ फुलविण्याचा संकल्प केला. मागील दोन आठवडे त्यांनी बीड शहरातील विविध भागात जावून सर्वच वार्डात भेटी देवून मतदारांशी संपर्क केला. त्यांच्या या संपर्काची पूर्ती देवाभाऊंच्या सभेने होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
जयदत्त क्षीरसागरांमुळे भाजपाला मिळाले हत्तीचे बळ!
अण्णा भाजपवासी होणार का?
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणूकीत घेतलेला निर्णय बीडकरांच्या जिव्हारी लागला होता, नंतर विधानसभेत त्यांनी माघार घेतली. मागील सहा वर्षांपासून पक्ष विरहित राजकारण चालू आहे. सत्तेत नसले तरी कायम जनतेत राहणे, शहराबरोबरच जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न धसास लावणे त्यासाठी क्षीरसागरांचा आग्रह असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयदत्त क्षीरसागरांचे राजकीय नाते अवघे महाराष्ट्राला माहित आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रेमाखातरच त्यांनी नगरपालिका निवडणूकीत पक्षात नसतानाही आणि राजकीय भूमिका स्पष्ट करण्यापूर्वी थेट भाजपासाठी प्रवेश सुरु केला. वार्डावार्डात जावून सभा घेतल्या. त्यांचे जुने जाणते समर्थक कामाला लावले. जयदत्त क्षीरसागरांच्या या निर्णयामुळे भाजपाला ऐन निवडणूकीत ‘हत्ती’चे बळ मिळाले आहे. भाजपासाठी प्रचार यंत्रणा लावणारे जयदत्त अण्णा भाजपवासी होणार काय? याकडे त्यांच्या समर्थकांसह बीडकरांचे लक्ष लागले आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री याबाबत काय बोलणार हे ही औत्सुक्याचे ठरणार आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


Leave a comment