सत्तेत असूनही भाजप डिजीटलवरच!!

मतदार संघात जयदत्त्त क्षीरसागरच ‘वन मॅन आर्मी’

बीड । वार्ताहर

सत्ता असल्यावर काय असते आणि सत्ता गेल्यावर काय होते याचा अनुभव जिल्ह्यातील तरूण नेत्यांनी घेतला आहे. माजी पालकमंत्री धनंजय मुंडे हेच केवळ परळीत राष्ट्रवादीचे अभियान राबवत असून बीडमध्ये तर राष्ट्रवादीचे भलेभले कार्यकर्ते माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर गटात सामील होवू लागले आहेत. आता राष्ट्रवादीत कोणी राहते की नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली असून आ.संदिप क्षीरसागर यांची तगडी टिम नेस्तनाबुत झाली आहे. सार्वजनिक राजकारणापेक्षा त्यांनी कारखाना आणि इतर काही कामांना महत्व दिल्यामुळे जवळपास महिनाभरापासून ते अदृश्य झाल्यासारखे झाले आहेत. दुसरीकडे राज्यात भाजपाची सत्ता येवूनही बीडमध्ये भाजपा केवळ डिजीटलवरच दिसून येत आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूकीच्या दृष्टीने माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटानेच जोरदार तयारी चालू असून ते ही सध्या वन मॅन आर्मीसारख्याच परिस्थितीत आहेत. ते नेमक्या कोणत्या शिवसेनेत आहेत? याबद्दलही बीडमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आगामी काळात त्यांचा काय निर्णय होता? यावरच बरेच काही अवलंबून आहे.


दोन वर्षापूर्वी राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी पून्हा पावरफूल झाली होती. जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सुत्रे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्याकडे आली होती. अमरसिंह पंडित हे शॅडो पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार हाकत होते. मात्र सत्तांतरापूर्वी काही काळापासून त्यांनीही जिल्ह्याचा कारभार सोडून गेवराई मतदारसंघाचा कारभार पून्हा हाती घेतला. त्यांनीही जयभवानी व्यतिरिक्त इतर दुसर्‍या कारखान्यात लक्ष घातल्याने तेही मतदारसंघात कमी आहेत. बीड मतदारसंघाचा विचार केला तर शहरातील राष्ट्रवादीची मोठी टिम काही दिवसापूर्वीच जयदत्त क्षीरसागर गटामध्ये सामील झाली होती. विशेष म्हणजे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपण नेमके कुठे आहोत? हे अजून स्पष्ट केलेले नाही. तरीही मतदारसंघामध्ये त्यांनी मोठी ताकद निर्माण केली आहे. गतविधानसभा निवडणूकीच्यावेळी नाराज कार्यकर्ते पून्हा आपल्याकडे वळवण्यात क्षीरसागर यशस्वी होवू लागले आहे. आगामी काळातही राष्ट्रवादीतील मोठ्या गटाचा क्षीरसागरांच्या गटात प्रवेश होण्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद क्षीण होत चालली आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आ.संदिप क्षीरसागर यांच्या गटातील मोठमोठे मासे आपल्या गळाला लावण्यात यश मिळवल्याने राष्ट्रवादी सुफडासाफ झाल्याचे चित्र सध्यातरी आहे. राष्ट्रवादीचा विरोधक पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजपा आहे. शिवसेनेतच दोन गट झाल्याने आगामी काळात नेमके काय होणार? हे कोणीही सांगू शकणार नाही. भाजपाचे पदाधिकारी पक्षाला किती फायदेशीर आहेत? हे गेल्या काही वर्षातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये दिसून आलेले आहे. केवळ भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरच बीड मतदारसंघाची मदार अवलंबून आहे. स्वत:च्या ताकदीवर पक्षाला मतदान मिळवून देणारा एकही पक्ष कार्यकर्ते अथवा नेता बीडमध्ये नाही. त्यामुळे बीडमध्ये भाजपा केवळ डिजीटलवरच आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर सध्या वन मॅन आर्मी चालवत असून सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधत गेल्या सर्व निवडणूकीची वचपा काढण्याची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.