बीड | वार्ताहर
तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बायोडिझेलचा गोरख धंदा खुलेआम सुरु आहे. वास्तविक या बायोडिझेलच्या विक्रीला प्रशासनाकडून कसलीही परवानगी दिल्याचे अद्याप समोर आलेले नाही. असे असतांनाही तालुक्यातील बीड-औरंगाबाद महामार्गावरील हिंगणी फाटा येथे एका पेट्रोल पंपावर बायो डिझेलची विक्री केली जात होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी (दि.5) दुपारी महसुल व पोलीसांच्या पथकाने संयुक्त छापा मारला. या कारवाईमुळे बायो डिझेलची अवैध विक्री करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यात बायो डिझेलची विक्री केली जात असल्याची तक्रार खुद्द काही पेट्रोल पंप चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने खरच जिल्ह्यात बायो डिझेल पेट्रोल पंपावरुन विक्री केली जाते की नाही या बाबत कोणतीही माहिती पुढे आली नव्हती. दरम्यान बीड-औरंगाबाद महामार्गावरील हिंगणी फाटा येथे एका पंपावर बायोडिझेलचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, बीडचे तहसीलदार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संजय राऊत, बीड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश उबाळे, मंडळाधिकारी नितीन जाधव, तलाठी पठाण यांच्यासह पेट्रोल कंपनीचे व्यवस्थापक यांनी या पंपावर छापा मारला. तिथे काही बायोडिझेलचे नमुनेही ताब्यात घेण्यात आले असून हा पंपा सध्या चौकशी होईपर्यंत सील करण्यात आला आहे.
Leave a comment