परळी एमआयडीसीचे नोटिफिकेशन निघाले, राजपत्र प्रसिद्ध झाले
सिरसाळा येथील 35 हेक्टर जमीन औद्यीगिक क्षेत्र म्हणून घोषित
बीड । वार्ताहर
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी तालुक्यातील सिरसाळा येथील एमआयडीसी उभारणीच्या कामास वेग आला आहे. सिरसाळा येथील गट क्र. 343 मधील 35 हेक्टर जमीन उद्योग विभागाने औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने याबाबतचे नोटीफिकेशन निघाले आहे. याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध झाले असून शासनाचे अवर सचिव किरण जाधव यांनी ते प्रसिद्ध केले आहे.
काही दिवसांपूर्वीच सिरसाळा येथे एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने अधिकृत मान्यता प्रदान केली होती. याबाबतची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतः ट्विट करून देखील दिली होती. सिरसाळा येथे पंचतारांकित एमआयडीसी उभारणे हे आपले स्वप्न असून हे साकारण्याचा दृष्टीने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. सन 2017 पासून धनंजय मुंडे यासाठी प्रयत्न करीत असून राज्यात सत्ताबदल होताच डिसेंबर 2019 चे अधिवेशनात त्यांनी या बाबतची पहिली बैठक घेऊन कारवाई सुरू केली आणि अवघ्या वर्षभरात याबाबतचे नोटीफिकेशन प्रसिद्ध झाले आहे. धनंजय मुंडे यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी उभारून बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. उद्योग विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या राजपत्रामध्ये गट क्र. 343 मधील 35 हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली असून परळी सिरसाळा रस्त्यालगतच्या या जमिनीवर औद्योगीकीकरण झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व गुंतवणूक होणार आहे.
अंबाजोगाईत उभारणार अद्ययावत
वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई उपरिवहन क्षेत्र कार्यालयात वाहनांचे अद्यायावत परीक्षण व निरीक्षण केंद्र ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे या केंद्रीय संस्थेच्या अधिपत्याखाली अंबाजोगाई येथे उभारण्यासाठी 8 कोटी 60 लाख रुपयांच्या आराखड्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. राज्यातील एकूण 13 परिवहन कार्यालयात या केंद्रांना मजुरी देण्यात आली असुन, या यादीत अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा समावेश आहे. या केंद्राची इमारत उभारणी, वाहन परीक्षण करणारी अद्ययावत उपकरणे, फोर लेन रॅम्प, अशा विविध खर्चाच्या एकूण 8 कोटी 60 लाख रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
Leave a comment