राख वाहणार्या चालकांकडून करुन घेतली रस्त्यांची सफाई
गाड्या अडवून चपलांनी केली मारहाण;व्हिडीओ व्हायरल
परळी । वार्ताहर
परळी-बीड रस्त्यावर खुल्या राख वाहतुकीमुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील पांगरी येथील महिला संतप्त झाल्या. राख वाहतूक करणार्या वाहनांना थांबवत त्यांनी रस्त्यावर विखुरलेली राख चालकांना स्वत:च्या शर्टने साफ करण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे तर काही चालकांना वाहनातून खाली ओढत चपलांनी मारले. आज शुक्रवारी (दि.25) सकाळी हा प्रकार घडला. दरम्यान यापुढे राख वाहतूक करतांना नियमांचे पालन न केल्यास अशाच पद्धतीने वाहनचालकांना रस्त्यावर अडवून राख साफ करण्यास भाग पाडू असा इशारा या परिसरातील महिलांनी दिला आहे.याबाबतचे व्हिडीओही समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत.
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात राख साठवण्यासाठी जागा निश्चित केली आहे. या राखेचा वापर करून वीट निर्मिती केली जाते. या ठिकाणी अनेक वीटभट्ट्या असून या राखेची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या राखेला बीड जिल्ह्यातून मागणी असते. या मागणीची पूर्तता करण्यासाठी परळी व परिसरातील नागरिकांना या राख वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तर कित्येकांना विविध आजारांना बळी पडावे लागले आहे. दरम्यान अनेक आंदोलने करूनदेखील या राख वाहतुक करणार्या वाहन चालकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. वाहनातून उडणारी राख परिसरातील रस्त्यावर आणि घरात विखुरली जात आहे. त्यामुळे आजार बळावत आहेत. याच कारणावरुन शुक्रवारी सकाळी पांगरी येथील महिलांनी राख वाहतुक करणारी वाहने अडवून चालकांना वाहनातून खाली ओढत स्वत:च्या शर्टने राख साफ करण्यास भाग पाडले.ज्यांनी विरोध केला त्यांना चपलानेही मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या घटने प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Leave a comment