अर्धी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर
बीड । वार्ताहर
शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन साजरा होत असतांना मराठवाड्यातील काही पदाधिकारी बदलण्याची वेळ पक्षावर आली आहे यामध्ये बीडचे दुसरे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांना अचानक पदावरुन काढण्यात आले असून त्यांच्या जागी माजलगावचे तालुकाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन मुळूक यांना पदावरुन का काढले याचे कारण मात्र पक्षाकडून देण्यात आले नाही. मात्र निष्क्रीयपणा सचिन मुळूक यांना भोवला असल्याची चर्चा पदाधिकार्यांमध्ये सुुरु झाली आहे. दरम्यान अचानक खांदेपालट केल्याने शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झाली असून सचिन मुळूक यांचे समर्थक आणि काही जुने पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. सचिन मुळूक समर्थकांनी राजीनाम्याची घोषणा केली असून बहुसंख्य पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात आले. काल सोमवार रोजी शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी माजलगावचे अप्पासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्याकडे माजलगाव, केज आणि परळी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेने मंगळवारी बीड, लातूर जिल्ह्याच्या पदाधिकारी निवडी जाहिर झाल्या. त्यानुसार जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्याकडून माजलगाव, केज, परळी विधानसभा मतदार संघाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. तर, माजलगावचे आप्पासाहेब जाधव यांना जिल्हा प्रमुख बीड शिवसेना म्हणून माजलगाव, केज आणि परळी विधानसभा मतदार संघाची नियुक्ती दिली आहे. सचिन मुळूक यांना हा अनपेक्षित धक्का समजला जात असून यामुळे एकच चर्चा शिवसैनिकात होताना दिसत आहे. याच सोबत गणेश वरेकर व शिवाजी कुलकर्णी यांची उपजिल्हा प्रमुख म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेकडून मोठा काळानंतर माजलगावला न्याय दिल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांना अगदी तीन वर्षाच्या कार्यकाळात ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक वार्डात शाखा प्रमुख, बुथ प्रमुख नियुक्त करून ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षाला यश मिळवून दिले. केज, परळी (वै.) व माजलगांव मतदार संघात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असतांना तसेच जिल्ह्यातील कुठल्याही पदाधिकार्यांची तक्रार नसतांना अचानकपणे जिल्हा प्रमुख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय नेमका कोणाचे भले करणार आहे हा प्रश्न सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांना पडलेला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आदेश शिवसैनिक म्हणून आम्हाला मान्य असला तरी यावेळी जिल्हा प्रमुख बदलतांना कोणत्याही पदाधिकारी व शिवसैनिकाला चर्चा न करता किंवा साधी विचारपुस सुध्दा न करता हा निर्णय अचानक पणे घेण्यात आला. तरी या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा माजलगांव, केज, परळी मतदार संघातील पदाधिकारी सामुहीक राजीनामे देवून शिवसैनिक म्हणून काम करूत अशी संतप्त प्रक्रिया शिवसैनिक व पदाधिकारी यांनी दिली आहे. यावेळी धारूर/ वडवणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, माजलगांव उपजिल्हा प्रमुख सुशिल पिंगळे, जिल्हासहसंघटक योगेश नवले, अंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, माजलगांव शहर प्रमुख धनंजय शेळके, अंबाजोगाई शहर प्रमुख गजानन मुडेगांवकर, माजलगांव विधानसभा समन्वयक दासू पाटील बादाडे, माजलगांव उपतालुका प्रमुख माऊली कदम, युवासेना उपजिल्हा प्रमुख अभिजीत भालेकर, युवासेना अंबाजोगाई तालुका प्रमुख सुदर्शन निकम , माजलगाव युवासेना तालुका प्रमुख बाळासाहेब मेंडके, अभय मोहरीर , माजलगांव उपशहर प्रमुख सुरेश जाधव, रामेश्वर काशिद, अंबाजोगाई उपशहर प्रमुख गणेश जाधव, अंबाजोगाई शहर समन्वयक अर्जुन जाधव, अंबाजोगाई उप तालुका प्रमुख वसंत माने, नाथराव मुंडे, खंडू पालकर आदींनी केले आहे.
Leave a comment