गेवराई तालुक्यातील मिरगाव येथील दुर्दैवी घटना
गेवराई । वार्ताहर
कपडे धुण्यासाठी आईसोबत गोदापात्रेत गेलेल्या चिमुकल्या मुलीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. मुलगी दिसेनासी झाल्याने तिच्या आईने व तिच्या पाठोपाठ चुलत बहिणीने पाण्यात उड्या मारल्या. परंतु त्या दोघींचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील मिरगाव येथील गोदावरी नदीपात्रात बुधवारी (दि.2) सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एकाच कुटूंबातील तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मिरगावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी तलवाडा पोलिस दाखल झाले.
रंजना गोडबोले (31), त्यांची मुलगी अर्चना गोडबोले (11) व पुतणी शितल गोडबोले (10, सर्व रा.मिरगाव ता.गेवराई) अशी मयतांची नावे आहेत. मिरगाव येथील रंजना गोडबोले या बुधवारी सकाळी कपडे धुण्यासाठी गावालगतच्या गोदापात्रावर गेल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी अर्चना व पुतणी शितल या दोघी त्यांच्यासोबत गेल्या होत्या. रंजना या कपडे धुत असतांनाच नदीकाठी खेळणारी अर्चना अचानक गोदापात्रेत बुडाली. ती दिसेनासी झाल्याने आई रंजना यांनी तात्काळ पाण्यात उडी मारून तिचा शोध सुरू केला. त्यांच्या पाठोपाठ पुतणी शितल हिनेही पाण्यात उडी मारली. परिसरातील ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली.
नंतर तिघींनाही पाण्याबाहेर काढत तातडीने उपचारासाठी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तलवाडा ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रताप नवघरे यांच्यासह पोलिस कर्मचारी तसेच शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पुजाताई मोरे, पत्रकार अल्ताफ कुरेशी यांनी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. या प्रकरणी तलवाडा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय.राठोड पुढील करीत आहे.या घटनेने मिरगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान यापूर्वी काही दिवसापूर्वीच तालुक्यातील संगमजळगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
-------
Leave a comment