नियम डावलणे महागात: चारित्र्य पडताळणी, पासपोर्टला मुकावे लागणार
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू आहे. या दरम्यान उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी धडक कारवाया सुरु केल्या आहेत. बुधवारी (दि.19) दिवसभरात जिल्ह्यात सहा लाख 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे नियम डावलल्यास चारित्र्य पडताळणी व पासपोर्टलाही अडचणी येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिला आहे.
कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यांच्या सर्व सिमांवर चेकपोस्ट आणि नाकाबंदी केल्या आहेत. जिल्हाभरात 79 फिक्स नाकाबंदी पाँईंट लावले आहेत. दरम्यान, बुधवारी तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणार्यांवर 1113 खटले दाखल करुन त्यांच्याकडून तीन लाख 53 हजारांचा दंड वसूल करण्यात आला तर, विनाकारण बाहेर फिरणारे, अवैध प्रवासी वाहतूक अशा 1240 लोकांवर खटले भरुन त्यांच्याकडूनही दोन लाख 67 हजारांचा दंड करण्यात आला.दरम्यान, कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर.राजा,जि.प.सीईओ अजित कुंभार हे तीन प्रमुख अधिकारी रस्त्यावर उतरत आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक आर.राजा म्हणाले, कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकार्यांनी लागू केलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाया सुरु आहेत. यापुढे कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत असेल किंवा मास्क वापरत नसेल तर पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीवर आक्षेप घेण्यात येईल. अशा लोकांची स्वतंत्र नोंद घेणे सुरु आहे.
Leave a comment