जयदत्तअण्णा जिल्हाधिकार्यांना बोलले
बीड । वार्ताहर
बीड जिल्हयातील खते बि-बियाणे फर्टीलायजर दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकर्यांची लगबग सुरु असून अशावेळी दुकाने सुरु राहिली पाहिजेत याबाबत क्षीरसागरांनी आग्रही भूमिका मांडली, तसेच जिल्हा कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सत्यनारायण कासट यांनीही याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यानंतर आजपासून कृषी विक्रेत्यांना कृषी साहित्य विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असून 16 ते 25 मे या कालावधीत जिल्ह्यातील सर्व कृषी आस्थापना सकाळी 7 ते 10 या वेळेत सुरु राहणार आहेत. तसे आदेशही जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहेत.
या वर्षी पावसाळी हंगाम हा चांगला होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून या वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तुर, मका, उडीद, मुग आदी पिकांची लागवड होणार असून जुन महिन्यात वेळेवर पाऊस पडेल असा अंदाज असून शेतकर्यांना बी-बियाणे व खते खरेदीसाठी बीड जिल्हयातील खतांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1वाजे पर्यंत उघडी ठेवणे गरजेचे असून ग्रामीण भागातील शेतकर्यांना बि-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी वेळ मिळेल.बीड जिल्ह्यातील शेतकर्यांची मागणी असून शेतकर्यांचे हित लक्षात घेता कृषीदुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर प्रशासनाने आगामी दहा दिवसांच्या कडक निर्बंधातून कृषी आस्थापनांना वगळले असून आजपासून दररोज सकाळी 7 ते 10 या वेळेत ही दुकाने सुरु राहणार आहेत.
Leave a comment