पोलिसांच्या कारवाईनंतर तहसीलदारांनी केली दुकाने सील
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरु असतानाही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला दुकाने बंद ठेवून सहकार्य करणे दुरच;मात्र जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून सकाळी सातच्या सुमारास दुकाने उघडणार्या बीडच्या मोंढ्यातील दुकानदारांना पेठ बीड पोलीसांसह महसूल प्रशासनाने चांगलीच अद्दल घडवली. रविवारी (दि.9) सकाळी केलेल्या केल्या गेलेल्या या कारवाईत पोलिसांनी 9 व्यापार्यांवर गुन्हा नोंद करुन मालवाहतूक करणार्या वाहनांची धरपकड केली, त्यानंतर तहसीलदार शिरीष वमने यांनी दुकाने सील केली.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 12 मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन कसोशीचे प्रयत्न करत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करताना प्रशासनाची धांदल उडत आहे.अशा परिस्थितीत बीडच्या जुन्या मोंढ्यात काही व्यापारी नियम डावलून सकाळी दुकाने उघडून मालाची खरेदी-विक्री करत असल्याची माहिती पेठ बीड पोलीसांना मिळाली. त्यानंतर रविवारी सकाळी सात वाजता पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील हे पोलीस फौजफाट्यासह मोंढ्यात दाखल झाले. यावेळी चित्रीकरणात त्यांनी कारवाई केली. मालाची वाहतूक करणारी वाहने पकडून ठाण्यात नेली.
या प्रकरणात पोलीस अंमलदार शेख अन्सार यांच्या फिर्यादीवरुन शेख जहीर शेख शबीर, सुलेमान युनूस मोसीन, शेख जावेद रौफ, गणेश दत्तात्रय निर्मळ, योगेश सुभाष कदम, मोहम्मद जाफर बेग, प्रफुल्ल विनोदकुमार दर्डा,तांबोळी नवशाद तांबोळी युनूस, संतोष आदिनाथ रोटेकर यांच्याविरुध्द कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी या कारवाईची माहिती कळविल्यावर तहसीलदार शिरीष वमने हे मोंढ्यात दाखल झाले. त्यांनी नऊ दुकाने सील केली.
आता परवानगीशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत
नियम पाळणे सर्वांची जबाबदारी आहे. लॉकडाऊन कालावधीत नियमबाह्यपणे दुकाने उघडी ठेऊन मालाची खरेदी-विक्री करताना आढळलेल्या 9 दुकानांवर गुन्हे नोंद करुन ते सील केले आहेत. प्रशासनाच्या परवानगीशिवाय आता ते व्यवहार करु शकणार नाहीत अशी माहिती तहसीलदार शिरीष वमने यांनी दिली.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment