मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
माजलगाव । वार्ताहर
येथील रजिस्ट्री कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट सुरू असून शुक्रवारी या दलालांनी बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करावी यासाठी येथील रजिस्ट्रार सोबत 'दादागिरी' केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.मागील 6 महिन्यात शहरात भूमाफियांनी सर्व बेकायदेशीर प्लॉटिंग पाडली असून बागायती जमिनी जिरायती दाखवून रजिस्ट्री होत आहे.रजिस्ट्री ऑफिस मध्ये रजिस्ट्री लिहून देण्याच्या नावाखाली दलाली करणारे जास्त झाले असून मागील अनेक वर्षांपासून ते बेकायदेशीर काम कायदेशीर करून देत आहेत.
दलालाने रजिस्ट्रारला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
येथील रजिस्ट्री कार्यालयाला दलालांनी चांगलेच वेढले आहे. हे दलाल बोगस कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून रजिस्ट्री करत असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास एक दलाल एका जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी आला. रजिस्ट्रार पी.एम.राठोड त्याने दिलेली कागदपत्रे तपासू लागले. यावेळी राठोड यांना कागदपत्रामध्ये ही जागा बागायतीमध्ये येत असतांना ही रजिस्ट्री
जिरायतीत दाखवण्यात आली असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी बागायती क्षेत्राची जिरायती म्हणून रजिस्ट्री होऊ शकणार नाही असे सांगितले. यामुळे दलाल व रजिस्ट्रारमध्ये वाद होऊन प्रकरण मारामारीपर्यंत गेले. काही वेळाने पोलीस रजिस्ट्री कार्यालयात आले. त्यांच्या समोरही हा वाद सुरूच होता. कार्यालयात जवळपास दोन तास सुरू असलेल्या या वादामुळे रजिस्ट्रीसाठी आलेल्या अनेकांना ताटकळत बसावे लागले. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.
रजिस्ट्रारची तक्रार नाही
कार्यालयात मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असताना ही रजिस्ट्रारने गुन्हा दाखल का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे . आपण त्या लोकांची तक्रार दिल्यास आपलेच कारनामे उघड होतील या भितीने रजिस्टार पी.एम.राठोड यांनी तक्रार दिली नसल्याची चर्चा आहे.
Leave a comment