आष्टी तालुक्यातील मोराळा येथे ‘एसीबी’ची कारवाई
आष्टी । वार्ताहर
वडिलोपार्जित शेत जमिनीचे तहसीलदारांच्या आदेशाने वाटणीपत्र तयार करुन ती जमिन नावावर करुन देण्यासाठी 4 हजार 500 रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 3 हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी मोराळा (ता.आष्टी) सज्जाच्या तलाठ्यास ‘एसीबी’ने ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.2) दुपारी 1 वाजेच्या सुमारास मोराळा बसस्थानक परिसरात ही कारवाई झाली.
बाळु महादेव बनगे (51) असे त्या तलाठ्याचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील तालुक्यातील मोराळा सज्जासाठी ते कार्यरत आहेत. तक्रारदार शेतकर्याच्या मौजे वनवेवाडी (ता.आष्टी) येथील वडिलोपार्जित शेत जमिनीचे आष्टी तहसीलदारांच्या आदेशाने वाटणीपत्र तयार झाल्यानंतर ती जमिन तक्रारदारासह त्यांचे भाऊ, बहिण, आई, वडिल यांच्या नावे करण्यासाठी तसेच अनुदान मिळवून देण्यासाठी व आई-वडिलाचे पगार चालू करण्यासाठी 4 हजार 500 रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती 3 हजार स्विकारण्याचे मान्य केले होते. याबाबत बीड एसीबीकडे तक्रार केल्यानंतर एसीबीने 14 जानेवारी 2021 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुपारी बीड ‘एसीबी’ने मोराळा येथे सापळा रचला असता तलाठी बाळु बनगे याने लाच मागणी करुन लाच रक्कम स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. यावरुन संबंधिताविरुध्द आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एसीबीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे, चालक अंमलदार मोरे यांनी ही कारवाई केली.
Leave a comment