प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दिलेले निर्देश
राजकीय दबावापोटीच - नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर
बीड । वार्ताहर
अभियंता दंडे प्रतिनियुक्ती प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे ऐकण्यात आले आहे; मात्र ही कारवाई केवळ राजकीय दबावापोटी करण्यात आली असून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वरिष्ठ अधिकार्यांना असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. कुठल्या एका अधिकार्याला प्रतिनियुक्तीवर पाठवावे अशी मागणी करणे चुकीचे कसे? लोकप्रतिनिधी म्हणून केलेली मागणी ही चुकीची नाहीच त्यामुळे रेखावार यांनी दिलेले निर्देश हे चुकीचे असून हेतुपुरस्सर आहेत याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
नगरपालिकेत सुरू असलेल्या कामांवर गुणवत्ता आणि दर्जेदार कामे व्हावीत म्हणून एखाद्या अधिकार्याची प्रतिनियुक्ती करण्याची मागणी करणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून आपले कर्तव्य होते;परंतु विरोधकांनी याबाबत कामात खोडा घालण्याच्या उद्देशाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले अभियंत्यांना नियुक्त करण्याची मागणी करणे गैर नाही मात्र या प्रकरणात केवळ आपली बदनामी करण्यासाठी राजकीय हेतूने आणि जनतेत आपल्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे हेतूने कारवाई सुरू करण्यात आली मात्र याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यावर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराने नगराध्यक्षावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीही केली नाही किंवा तसे न्यायालयाचे निर्देशही नाहीत असे असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीडमधून जाता जाता अपात्रतेचे निर्देश देण्याच्या कागदावर कोणत्या उद्देशाने सही केली हे मात्र गुलदस्त्यात आहे. एखाद्या अधिकार्याला हे चांगले माहीत हवे की एखादे प्रकरण न्यायालयात सुरू असताना यामध्ये हस्तक्षेप करावा का? जनतेतून निवडून आलेल्या एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्यासाठी कोणती कारवाई करावी लागते हे देखील जिल्हाधिकारी रेखावार यांना कदाचित माहीती नसावी. त्यांनी दिलेले निर्देश हे केवळ राजकीय दबावापोटी असून याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. अभियंता दंडे यांना नियुक्त करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण जर पत्र दिले असेल तर त्यात लगेच भ्रष्टाचार झाल्याचा जावईशोध विरोधकांनी करू नये.एक वर्षापासून याप्रकरणी कुठलीही कारवाई का झाली नाही स्वतःपदावर असताना जिल्हाधिकारी रेखावर यांनी अशी कारवाई न करता जाताजाता कुणाला निर्देश दिले. बदली झाल्यानंतर 15 दिवसाने हे निर्देश काढलेच कसे? हाही संशोधनाचा भाग आहे
शिवसेनेच्या पालिकेला टार्गेट करण्याचा प्रयत्न
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्ह्यात केवळ शिवसेनेच्या नगर पालिकेला टार्गेट केले जात असून विकास कामात खोडा घालणार्या विरोधात आपण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे कॉग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
Leave a comment