सिंधुदुर्ग | प्रतिनिधी

'हे म्हणतात बंदखोलीमध्ये वचन दिले होते. मी कधीच बंददाराआड काम करत नाही. जे काही करायचं ते छातीठोकपणे जाहीर राजकारण करतो, मी उद्धव ठाकरेयांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते' .विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाराज होत शिवसेनेनं भाजपासोबत युती तोडत काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली. भाजपानं मुख्यमंत्रीपदासह सत्ता वाटपात ५०-५० स्थान देण्याचं वचन दिलं होतं, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वचनावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी मौन आज सोडलं. कोणतंही वचन दिलं नसल्याचं ठणकावून सांगत अमित शाह यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर घणाघाती टीका केली.

नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं. यावेळी शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या आरोपाचा समाचार घेतला. “मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका झाल्या होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं. तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं,” अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.

"बंद खोलीत नव्हे, मी खुलेआम वचन देतो"

पुढं बोलताना अमित शाह म्हणाले,”हे म्हणत आहे की, एका खोलीत वचन दिलं होतं आणि मी ते वचन दिलं होतं. मी काही खोलीत करत नाही. जे करतो ते सगळ्यांसमोर करतो. डंके की चोट पर करता हूँ. मी कधीही बंद दाराआडील राजकारण केलं नाही. मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे. कुणालाही घाबरत नाही. सगळ्यांसमोर बोलतो. मी असं कोणतंही वचन दिलेलं नव्हतं. वचन दिलं होतं, असं मानलं तरी उद्धवजी तुमच्यापेक्षा अडीचपट मोठा फोटो नरेंद्र मोदींचा वापरू प्रचार करत होते. मोदीजींच्या नावावर मतं मागितली. माझ्यासोबत सभा झाली. मोदीजींसोबत सभा झाली. प्रत्येक ठिकाणी बोललो एनडीएचं सरकार निवडून द्या. फडणवीसजी मुख्यमंत्री होणार. त्यावेळी का नाही बोलले? पण, असं कोणतंही वचन दिलेलं नव्हतं. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडून सत्तेत बसले. कलम ३७० हटवलं, घाबरत घाबरत म्हणतात आम्ही स्वागत करतो. राम मंदिर बनवण्याचा निर्णय होतो. तेव्हाही मी जाईल… जाणार नाही. काय झालं? आम्ही तर कधीच घाबरलो नाही. भाजपा सिद्धांतासाठी राजकारणात आलेली आहे. राजकारणासाठी सिद्धांत तयार करत नाही. मी शिवसेनेच्या मित्रांना सांगू इच्छितो की, तुम्ही सिद्धांतांसाठी आलेला नाहीत. बाळासाहेब गेले. आता राजकारणासाठी सिद्धांतांची तोडमोड सुरू आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेला चांगलं माहिती आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसते,” असं म्हणत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

'महाविकास आघाडी सरकार हे तीनटाकी ऑटोरिक्षा सरकार'

या वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून या ओटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, असे शहा म्हणत सरकारमधील तिन पक्षांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता नसल्याचे शहा यांनी सूचिक केले.

मोदींच्या नावावर मतं मागितली

शिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

'मला कोरोना झाला, याचा काही लोकांना आनंद झाला होता'

130 कोटींच्या या देशात वैद्यकीय सुविधांकडे दुर्लक्ष होते. हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वीक होतं. मात्र मोदींच्या नेतृत्वात ज्याप्रकारे कोरेनाशी लढाई केली आहे, त्याचे जगात स्वागत होते आहे. पायाभूत सोयीसुविधा आम्ही लॉकडाऊन काळात मंजूर केल्या. व्हेंटीलेटर, मास्क, पीपीई किट इथे बनत नव्हते. अवघ्या 10 महिन्यात आपण एक नंबर निर्यातक झालो आहोत. सर्वात जास्त रिकव्हरी भारतात आहे. मलाही कोरोना झाला होता, त्याचा काही लोकांना आनंदही झाला होता' असा टोलाही शहा यांनी विरोधकांना लगावला.

तसंच, 'वैद्यकीय क्षेत्राने जो लढा दिला त्यांचे अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. आपले डॉक्टर्स व पॅरा मेडिकल स्टाफने जी लढाई लढली त्याला तोड नाही. आपण तयार केलेली लाईन ऑफ ट्रीटमेंट आज जगात स्वीकारली गेली आहे. जगात फक्त डॉक्टर आणि सरकार लढत असताना भारतात यासोबतच जनतेचे सर्व घटक या लढाईत उतरले, 70% दुनियेतील वॅक्सिन भारत पुरवत आहे, वेगाने वॅक्सिनेशन होत आहे, असंही शहांनी डॉक्टरांचं कौतुक केलं.

नारायण राणेंवर भाजपमध्ये अन्याय होणार नाही

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांचे तोंड भरून कौतुक करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. अन्यायाविरुद्ध पाय रोवून उभा राहणारा नेता म्हणजे नारायण राणे हे असून जेव्हा अन्याय झाला तेव्हा राणेंनी प्रतिकार केला. अन्याय झाल्यानेच त्यांचा प्रवास वळणावळणाने झाला, असे सांगतानाच राणे यांच्यासारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगले माहीत आहे, असे म्हणत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही : अजित पवार

भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला उत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंतचा बराच काळ कोरोना महामारीत गेला आहे. त्यामुळे विकास दर घटला असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.