मुंबई। प्रतिनिधी
राज्यातील शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची घोषणा आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होत आहे. आधी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. दरम्यान, शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची लस येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा धोका कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्यातील 5 वी ते 8 वीपर्यंत शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचं सांगितलं असलं तरी मुंबई पालिकेकडून शाळा पुढील सूचनेपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
यामुळे महापालिका आणि राज्यसरकार मध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं समोर आलं आहे. महापालिकेच्या नव्या परिपत्रकानुसार शाळा 16 जानेवारीपासून पुढील सुचनेपर्यंत बंद राहतील.तर राज्यसरकारने दिलेल्या माहितीनुसार 27 जानेवारीपासून 5 वी ते 8 वीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळा प्रशासनाने तयारी कुणाच्या आदेशाने करावी? असा सवाल उपस्थित झाला आहे.
Leave a comment