भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार
अत्याचाराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवार यांची भेट
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. बलात्काराचे आरोप आणि विरोधकांकडून होत असलेली टीका, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथं धनंजय मुंडे दाखल झाले आहेत.शरद पवार यांच्या भेटीत धनंजय मुंडे हे संपूर्ण प्रकरणाबाबत होत असलेल्या आरोपांवर स्वत:ची बाजू मांडणार आहेत. राष्ट्रवादीचे वजनदार नेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्याने पक्षाची प्रतिमाही मलीन होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे धनंजय मुंडे यांना आरोप प्रकरणातील पुढील भूमिकेबाबत काय सल्ला देतात, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.धनंजय मुंडे यांची बलात्कार प्रकरणात संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार हे खरंच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.कोणत्या नेत्याने काय म्हटलं आहे?'राजकारणात आयुष्य उभं करायला आणि राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही,' असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.दुसरीकडे, भाजपचे विविध नेते मात्र या प्रकरणावरून राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत आहेत. 'धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा, गुन्हा दाखल करून तपास सीबीआय कडे अथवा निवृत्त न्यायाधीश यांच्या कमिटीकडे सोपवावा. शर्मा भगिनींना संरक्षण द्यावे, दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने आणि त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे. तसंच द्विभाऱ्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले असल्यास कार्यवाही व्हावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर निषेध आंदोलने करणार,' अशी आक्रमक भूमिका भारतीय जनता युवा मोर्चाने घेतली आहे.
धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना दुसऱ्या विवाहाचं प्रकरण चांगलंच अंगलट येण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात आपल्या दुसऱ्या विवाहाची माहिती लपविल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतची थेट लेखी तक्रारच केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्वाचे मुद्दे नमूद करत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत."धनंजय मुंडे यांनी दुसरं लग्न केल्याचं सार्वजनिकरित्या मान्य केलं आहे.
दुसऱ्या पत्नीची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेत असल्याचंही त्यांनी कबुल केलं आहे. याशिवाय, त्यांची दुसरी पत्नी असलेल्या रेणू शर्मा मुंबई पोलिसांकडे मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार देखील केली आहे", असं किरीट सोमय्या यांनी पत्रात नमूद केलं आहे. धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्यासाठी मुंबईत फ्लॅट घेऊन दिल्याचंही मान्य केलंय. शिवाय रेणू शर्मा यांच्या मुलांना आपलं नाव दिल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. पण ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंयज मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली होती. त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन आपण योग्य ती कारवाई करावी, असं किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही - जयंत पाटील
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी काल (12 जानेवारी) फेसबुकवर संबंधित महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग करणारे आणि खोटे आहेत, असे सांगत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदनगर येथील एका कार्यक्रमानंतर जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिक येथे संघाचे जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.” तसेच, “धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही त्या कबुलीसंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. यातील कायदेशीर बाब, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे, असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावे. एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
Leave a comment