टिळेकर-राठोड दोघांनाही तालुक्यातून हाकला
पालकमंत्री मुंडे-अमरसिंहांची गूपचिळी का?
बीड । वार्ताहर
गंगावाडी येथील रुस्तुम बाळाजी मते (55) या शेतकर्याचा वाळूच्या हायवाखाली चिरडून मृत्यु झाला नंतर शांत असलेली गोदाकाठ खवळली. जवळपास सात तासानंतर उपविभागीय अधिकारी टिळेकर, प्रभारी तहसिलदार रामदासी, पोलिस उपअधिक्षक राठोड यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत रुस्तुम मतेंचे प्रेत ताब्यात घेतले, परंतु रविवारी सकाळी 7 वाजता अपघात होऊन सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. उपअधिक्षक राठोड यांना विचारणा केली असता या प्रकरणी तक्रार नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले, तर पोलीस अधिक्षक राजस्वामी यांनी तर सोमवारी दुपारपर्यंत घटनेची माहिती घेण्याचाही त्रास घेतला नव्हता, दरम्यान गंगावाडी येथील काही नागरिकांना वाहने कोणाची, कशी होती अशी विचारणा केल्यावर पोलीसाच्या हायवाने अगोदर उडवले अन् नंतर शिवसेनेच्या, पदाधिकार्याच्या हायवाने चिरडले असे उत्तर दिले. सेनेचा कोण पदाधिकारी हे ग्रामस्थांना सांगता आले नाही मात्र बीडचा पदाधिकारी अन् बीडचाच खदीर नामक पोलीसाची हायवा असल्याने अनेकांनी सांगितले.
गेवराईचा गोदाकाठ राज्यात नेहमीच चर्चेत असतो. वाळूचा धंदा सर्वत्र चालतो, पण गेवराईत कुठलाही कायदा नाही, राजकीय पदाधिकारी, महसुल अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी काही पत्रकारही या धंद्यात सहभागी असल्याने सर्व सामान्यांचा आवाज ऐकणार कोण ? अशी चर्चा आहे. रविवारी सकाळी अपघात घडला, सोमवारी दुपारी 3 वाजता गेवराईचे पोलीस उपअधिक्षक राठोड यांना याबाबत विचारणा केली असता तक्रार नाही म्हणुन गुन्हा दाखल केला नसल्याचे ‘बालीशपणाचे’ उत्तर त्यांनी दिले. एखाद्या महामार्गावरील अपघातात पोलीस तक्रार दाखल करून सुमो टू कारवाई करतात,मग या अपघातात का नाही ? असा प्रश्न केलानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, पोलीस अधिक्षक आर.राजास्वामी यांनी तर माहितीच घेतली नव्हती. घटना काय? गुन्हा दाखल केला का? याची आपण अद्याप माहिती घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून पोलीस प्रशासन हप्तेखोरीमुळे किती सुस्त झाले आहे हेच जाणवते. अपघात घडल्यानंतर वाळू माफिया, तलाठी मंडळ, अधिकारी, पथकातील कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी गंगावाडी-गेवराई मार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पोलीस उपअधिक्षक स्वप्नील राठोड यांनी ग्रामस्थांपैकी काही जणांना आंदोलन कशाला करता, त्याला निट वाहन चालवता येत नव्हते का? कायदा अन् सुव्यवस्थेच्या नावाखाली तुमच्यावर गुन्हा दाखल करू, गोंधळ कशाला घालता असे धमकावल्याचे अनेकांनी सांगितले.पोलीस अन् महसुल प्रशासन किती कमजोर झाले आहे याचीही या निमित्ताने ग्रामस्थांना प्रचिती आली आहे.
उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर याची गेवराईची कारकिर्द कायम वादातील राहिली आहे. नियमबाह्य कामाची अख्या गेवराईत चर्चा असते. तहसिल कार्यालयावर नियंत्रण ठेवणे या ऐवजी त्यांच्या कार्यालयावरच नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे. पोलीस उपअधिक्षक स्वप्नील राठोड यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यावाल्यांना कायम अभय भेटून आले आहे. यापुर्वी वाळूच्या कारवाईत त्यांना लबाड योध्दा असल्याची चर्चा आहे. गंगावाडीत शेतकरी चिरडून मेल्यानंतर त्यांच्या गावातील लोकांनी दमदाटी करणार्या टिळेकर-राठोड या दोघांनाही हकालपट्टी करावी, तालुक्यातून बदली करावी अशी मागणी गंगावाडी, राक्षसभुवन, साबळेश्वर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पालकमंत्री धनंजय मुंडे, अमरसिंह पंडितांनी लक्ष घालावे !
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, अन् गेवराईचे नेते अमरसिंह पंडित यांनी तालुक्यात काय चालले आहे. अधिकार्यांचा मस्तकाळपणा का वाढला, वाळू माफियांना पाठीशी कोण घालते या प्रकरणाचा शोध घेवून सत्तेचा उपयोग करून घ्यावा अशी मागणीही अनेक ग्रामस्थांनी केली आहे.
टोलनाका तपासा, हायवा सापडेल!
अपघात गंगावाडीमध्ये सकाळी 7 वाजता घडला. तालुक्यात सध्या राक्षसभूवन, तलवाडा येथेच वाळू उपसा राजरोस सुरु आहे. सकाळी सात वाजता गंगावाडीतून 3 हायवा भरुन गेले आहेत, तलवाड्यातून सकाळी हायवा गेले नसल्याचे त्या परिसरातील ग्रामस्थ सांगतात, मग सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान पाडळसिंगी नाक्यावर कोणते हायवा गेले ते पोलासांनी तपासावे, कोत्या हायवाखाली शेतकरी मेला हे लगेच लक्षात येईल. पण पोलीसांनाच हे प्रकरण दाबायचे आहे. पोलीस कर्मचारी एखाद्या अपघातात गेला असता तर पोलीसांनी असाच तपास केला असता का? असा सवाल मयत मते कुटूंबातील सदस्यांनी केला आहे.
पथकातील कर्मचारी कोठे होते?
गोदापात्रात वाळूची तस्करी रोखण्यासाठी अवैध उत्खनन रोखण्यासाठी 28 डिसेंबर रोजी तहसीलदार खाडेंनी मंडळनिहाय पथक तयार केले होते. या पथकाला आप-आपल्या मंडळातील वाळूचोरी रोखण्याची जबाबदारी दिली होती. गंगावाडी,धोंडराई, मंडळातंर्गत येते. या पथकाचे प्रमुख मंडळाधिकारी अंगद काशिद, तलाठी जे.एस.लेंडाए तलाठी वाकोडे, तलाठी कमलेश सुरावार, एस.एम.पांढरे आणि किरण दांडगे यांच्या मंडळामध्ये राजरोस अवैध वाळू उत्खनन सुरु असतानाही त्यांनी कसलाही विरोध केला नाही अथवा तहसीलदारांना तशी माहितीही दिली नाही. त्यामुळे या पथकातील कर्मचार्यांच्या कार्यपध्दतीबद्दलच शंका घेण्यात येत आहे.
Leave a comment