सोशल मीडियावरुन व्यक्त झाली तरुणाई
बीड । वार्ताहर
मावळत्या 2020 या वर्षाला निरोप देवून बीड जिल्हावासीयांमध्ये कोरोनाच्या संकटकाळात काळजी घेत 2021 या नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत केले. रात्री 12 वाजताचा ठोका पडताच बीड शहरासह जिल्हाभरात तरुणाईने फटाक्यांची आतिषबाजी करत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. यानिमित्त सोशल मीडियावरही हॅपी न्यू इयरचा ट्रेंड चालला. अनेकांनी ऐकमेकांना शुभेच्छा देत नवीन वर्ष सुख, समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे आणि आरोग्याचे जावे अशा शुभेच्छा दिल्या.
मावळत्या 2020 वर्षात फेब्रुवारी महिन्यापासूनच देशभरात कोरोनाचे संकट निर्माण झाले. नंतर 22 मार्चपासून सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे लॉकडाऊन जून महिन्यापर्यंत वाढत गेले होते. मागील 100 वर्षात कधीही कुणीही न अनुभवलेला असा टाळेबंदीचा अनुभव सर्वांनाच घ्यावा लागला. अनेकांना कोरोनाच्या विषाणूने सामावुन घेतले. त्यात अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकांनी कोरोनावर मात करत पुन्हा नव्याने आपले आयुष्य सुरु केले. कोरोना सारख्या संकटकाळात बीड जिल्हावासीयांनी सुरुवातीपासूनच प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमाचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध तसेच टाळेबंदीत विनाकारण बाहेर फिरणार्यांना कारवायांनाही सामोरे जावे लागले. एकीकडे ही सारी स्थिती असतांना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी अक्षरक्ष: देवदुतासारखी अवितरत काम करत राहिली. आणखीही डॉकटर, परिचारिका या कोरोना योध्दयांचे काम अविरत सुरु आहे. आज नवीन वर्षात प्रवेश करतांना स्वत:च्या जिवाची बाजी लावून कोरोना संकट काळात नागरिकांसाठी महत्वाची भुमिका बजावणार्या या योध्दयांचे स्मरण महत्वाचे ठरते. त्यांच्याशिवाय कोरोना संकटावर मात करणे अशक्य ठरले असते. नवीन वर्ष नव्या आशा, आकांक्षाचे आणि सर्वांना आरोग्यदायी जीवनाचे ठरावे अशा शुभेच्छा नववर्षाच्या प्रारंभी सार्याच जणांनी ऐकमेकांना दिल्या आहेत. 2021 हे वर्ष सार्यांसाठी कोरोना लढाईतून मुक्त होवून पुन्हा नव्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. याच जाणीवेतून सर्वत्र नववर्षाचे स्वागत केले गेले. जिल्हाभरात तरुणाईमध्ये नववर्षाचे स्वागत करतांना नवा उत्साह आणि आनंद दिसुन आला.
Leave a comment