मुंबई / प्रतिनिधी
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. जगातील १६ देशांत नव्या कोरोनाचा प्रसार झाला आहे. भारतातही नव्या कोरोनाचे २० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच कोविडचा धोका कायम असल्याने महाराष्ट्रराज्य शासनाने ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.
कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन ३१ जानेवारी २०२१पर्यंत लागू राहील, असे स्पष्ट करुन राज्य शासनाचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, यूकेवरून महाराष्ट्रात आलेल्या ४३ प्रवाशांचे नमुने तपासले आहेत, त्यात नवा स्ट्रेन आढळला नाही. तसेच यूकेवरून आलेले प्रत्येक व्यक्तीची योग्य तपासणी केली जात आहे. प्रवासी निगेटिव्ह असला तरी आम्ही त्याला होम क्वारंटाईन करतो. राज्य सरकार यूके स्ट्रेनबाबत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करत आहे, पण काही प्रवासी गायब असतील तर राज्य सरकार योग्य ती पावले उचलेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी ते म्हणाले पूर्वीच्या मार्गदर्शक सूचना पाळावयाच्या आहेत. कोविडसाठी जे निर्बंध घालण्यात आले आहेत, ते लागू आहेत. रेल्वे सेवेबाबत ते म्हणाले, नव वर्षात
कोविड रुग्ण संख्या किती वाढतेय त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबईतील लोकल सेवा सुरू करायच्या की नाही, शाळा, कॉलेज सुरू करायच्या की नाही हे सगळे निर्णय संख्येवर अवलंबून आहेत. यूकेतील नवीन स्ट्रेनवर आपण लक्ष ठेवून आहोत. याचा आढावा घेऊन मुख्यमंत्री लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
यासंदर्भात, राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने परिपत्रक जारी करत, लोकांनी आपल्या घरात राहूनच साध्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करावे, तसेच समुद्र किनारी, उद्याने आणि रस्त्यावर जाणे टाळावे, असे म्हटले आहे.या परिपत्रकात, विशेषत्वाने दहा वर्षांच्या आतील मुले आणि 60 वर्षांवरील वृद्धांना, महामारीच्या पार्श्वभूमीवर नवे वर्ष साजरे करण्यासाठी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या वर्षानिमित्त मुंबईतील मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, गिरगांव आणि जुहू आदी ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमतात.
महाराष्ट्र सरकारची नियमावली
- कोरोनाची परिस्थिती पाहता आवाहन आहे की, नव्या वर्षाचं स्वागत घरातच करावं.
- 31 डिसेंबरला नागरिकांनी समुद्रकिनारे, उद्याने विशेषत: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी सोबतच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये
- सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. सोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
- विशेषत: वयोवृद्ध (60 वर्ष) आणि मुलांनी (10 वर्ष) घराबाहेर पडणं टाळावं.
- 31 डिसेंबरला कोणत्याही धार्मिक अथवा सांकृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
- नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा गर्दी टाळा
- नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा आतषबाजी टाळा, नियमांचं सक्तीने पालन करा
- नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करतील.
- नाईट कर्फ्यू रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत जारी असेल.
31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब्ज रात्री 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. 11 वाजल्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.
Leave a comment