मुख्यमंत्री, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या आले होते संपर्कात
मुंबई | प्रतिनिधी युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे जगभरातून डिसले गुरुजींचं कौतुक केलं जात आहे. दरम्याम त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. या सत्कार समारंभासाठी सरकारने डिसले यांच्या आई पार्वती आणि वडील महादेव डिसले यांनाही खास निमंत्रित केलं होतं आणि त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी डिसले यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना राज्य सरकार पूर्ण मदत करेल असं आश्वासनही दिलं. राज्यात प्राथमिक शिक्षणात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्याच्या माध्यमातून आता ‘डिसले पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात येणार आहे. कोण आहेत रणजीत डिसले? आजच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही त्यांनी मंगळवारी भेट घेतली होती. तर त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही ते भेटले होते. आता त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना करोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक केलं होतं. तसंच डिसलेसरांनीही आपल्याला शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करायची आहे असं राज ठाकरे यांना सांगितलं होतं. महाराष्ट्राची मान डिसले सरांमुळे जगात उंचावली आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. |
Leave a comment