मुंबई | प्रतिनिधी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज 'मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य' आणि 'पालकमंत्री, नांदेड जिल्हा' या दोन फेसबुक पेजचे लोकार्पण केले.
चव्हाण यांनी बुधवारी सकाळी नागरिकांसाठी लिहिलेले एक पत्र पोस्ट करून दोन्ही फेसबुक पेजेस कार्यरत केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री व नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून घेतले जाणारे निर्णय लोकांपर्यंत पोहोचावेत, या हेतूने ही दोन्ही फेसबुक पेजेस सुरू केल्याचे चव्हाण यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे. 'मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य' या फेसबुक पेजवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेतले जाणारे निर्णय, राज्य शासनाचे आदेश यासंदर्भात माहिती दिली जाणार असून, 'पालकमंत्री, नांदेड जिल्हा' या फेसबुक पेजवर राज्य शासनाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासाठी घेतले जाणारे निर्णय, तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी घेतले जाणारे निर्णयांची माहिती दिली जाईल. या फेसबुक पेजेसचा शुभारंभ करतेवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, बांधकाम सचिव अनिल गायकवाड, उपसचिव बसवराज पांढरे, उपसचिव राजेंद्र रहाणे, खासगी सचिव डॉ. निशिकांत देशपांडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सहाय्यक संचालक (माहिती) नंदकुमार वाघमारे, माध्यम समन्वयक अभिजीत देशमुख आदी उपस्थित होते.
Leave a comment