बीड । विशेष प्रतिनिधी
पदवीधरच्या निवडणूकीत मोठ्या मतांनी विजय प्राप्त केल्यानंतर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे आ.सतिश चव्हाण मुंबईच्या दिशेने निघाले. योगायोग म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ही औरंगाबादहून मुंबईकडे निघाले होते. या दोन्ही नेत्यांनी मग एकाच विमानातून शेजारी-शेजारी बसून हवाई प्रवास केला. या दोन्ही नेत्यांच्या विमान प्रवासात विशेष असे काही नव्हते, मात्र निवडणूकीचा निकाल लागताच दोन्ही नेते सोबत प्रवासाला निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला रंगत आली होती. दरम्यान रात्री नऊ वाजता ते मुंबई विमानतळावर उतरले.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित उमेदवार सतीश चव्हाण यांनी 58 हजारांवर मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव केला.या मोठ्या विजयानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी सतीश चव्हाण रात्रीच्या विमानाने ते मुंबईला रवाना झाले. चव्हाण यांच्यासोबत त्यांचे इतर पदाधिकारीही होते. महत्वाचे हे की, याच विमानात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही होते.ते हिंगोलीला एका लग्नसमारंभासाठी गेले होते. फडणवीस हे मुंबईला जाण्यासाठी औरंगाबाद विमानतळावर पोचले व त्याच विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत आमदार प्रशांत बंबही होते. चव्हाण व फडणवीस यांच्यात प्रवासादरम्यान झालेल्या निवडणुकीसह इतर राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे सोशल मीडियावर शेअर झालेल्या छायाचित्रावरुन दिसत आहे.
मात्र या दोघांमध्ये एकाच सिटाचे अंतर म्हणजे एकप्रकारे सोशल डिस्टन्स होते. मात्र, या एकत्रित विमान प्रवासातून ‘ हा योगायोग की ठरवून केलेले बुकिंग’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. योगायोग म्हणजे सतीश चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात केवळ एकच सीट रिकामे होते. दोघांमध्ये संवादही घडला. तो राजकीय होता की, अन्य हे मात्र, समजू शकले नाही. परंतु निवडणुकीतील जय-पराजयाच्या समिकरणानंतर या दोन नेत्यांच्या या विमान प्रवासाने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधान आले. या विमान प्रवासाचे छायाचित्रही सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले.
Leave a comment