50 शेतकरी आत्महत्या मदतीसाठी प्रशासनाने ठरवल्या अपात्र
बीड । वार्ताहर
नापिकी आणि कर्जबारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मागील 5 वर्षात मराठवाडयात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतांनाच आत्महत्येचे मालीका सन 2020 मध्येही कायम राहीली आहेे. जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिन्याच्या कालावधीत तब्बल 160 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तशी नोंदही जिल्हाप्रशासनाकडे झालेली आहे.
कधी कोरडा दुष्काळ तर कधी, ओला दुष्काळ या संकटातून जिल्ह्यातील शेतकर्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच पेरणीपासून खत खरेदीपर्यंत अनेक शेतकरी खासगी कर्ज उचलतात मात्र न ंतर शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज फेडणे कठीण होवून बसते त्या नैराश्यातूनच शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यात 160 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्येचा हा आकडा निश्चितच दुर्देवी आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना शासनाकडून आत्महत्येचे प्रकरण पात्र ठरल्यानंतर 1 लाख रुपयांची मदत उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यात 160 पैकी केवळ 67 शेतकरी आत्महत्येची प्रकरणे जिल्हा प्रशासनाकडून पात्र ठरवण्यात आली आहेत. तर तब्बल 50 शेतकरी आत्महत्या निकषात बसत नसल्याचे कारण पुढे करत मदतीपासून संबंधितांच्या कुटूंबियांना अपात्र ठरविण्यात आले आहे. याशिवाय 43 शेतकरी आत्महत्येचे प्रकरणे जिल्हा स्तरावर चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आलेली आहेत. याबाबत पुढील बैठकीत निर्णय होणे आवश्यक आहे. दरम्यान मदतीसाठी पात्र ठरलेल्या शेतकरी कुटूंबियांना 67 लाखांची मदत वितरीत केली गेली आहे.
Leave a comment