- टेंबे गणपती स्थापनेची जय्यत तयारी
---------
माजलगाव / उमेश जेथलिया
माजलगावचा मानाचा गणपती म्हणून तसेच १२३ वर्षांची परंपरा असलेल्या टेंबे गणपती स्थापनेची मंडळाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असुन सोमवारी दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी या टेंबे गणपतीची स्थापना होणार आहे.
निजामकालिन राजवटीत 122 वर्षांपूर्वी स्थापना मिरवणूकीस परवानगी नसल्याने मिरवणूक आडविण्यात आली होती. त्यामुळे सदस्यांनी मिरवणूक अडविलेल्या ठिकाणाहून घोड्यावर हैद्राबाद येथे जात ताम्रपटावर स्थापना परवानगी आणली होती. यामुळे पाच दिवस गणपती त्याच ठिकाणी थांबविण्यात आला होता. यामुळे मागील 122 वर्षांपासुन या गणपतीची स्थापना पाच दिवसांसाठीच असते. स्थापनेपासूनच या गणपतीची मुर्ती माती, शेण, चिखल, साळवणाच्या मिश्रणातुन साकारली जाते. एवढे वर्षे लोटली काळ बदलला तरी देखिल ईकोफ्रंडली मुर्तीची परंपरा मंडळाने आजही टिकविलेली आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदुषण होते. याची जाणिव ठेवत चिखल - मातीच्या मुर्तीची स्थापना करण्यात येते. स्थापना वर्षे 1901 निजामकाळात विजेची सोय नसल्याने गणपती विसर्जन मिरणूकीत प्रकाश असावा म्हणून भाविक आगीचे टेंबे धरत असत. ही परंपरा आजही कायम असून यानंतर नवसपूर्ती, वंशवृध्दीसाठी मानाचे टेंबे घेउन अनेकजण मिरवणूकीत सहभागी होउ लागल्याने मंडळाला टेंबे गणपती असे नाव पडले.
चिखल, माती, शेण, गोमुत्र, दुधाच्या मिश्रणातुन साडेसहा फुट उंचीची ही मुर्ती सुनिल रत्नपारखी, पंकज रत्नपारखी यांनी साकारली तर या मुर्तीचे रंगकाम पंकज बागडे यांनी केले आहे. गणेशोत्सवात विवीध समाजापेयागी कार्यक्रमांचे आयोजन करते. कोरोना काळात गोर - गरिब, वंचित, उपेक्षित लोकांना 45 दिवस अन्नदानाचा यज्ञ, किराणा किटचे वाटप यासह विवीध उपक्रम मंडळाने राबविलेले आहेत. यावर्षी देखिल सोमवारपासुन ते शनिवार पर्यंत विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. - अनंतशास्त्री जोशी, अध्यक्ष टेंबे गणेश मंडळ, माजलगाव.
Leave a comment