वामनभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गहिनिनाथगड गडावर भक्तांचा जनसागर लोटला
श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाहून पिंपळवंडी प्रतिनिधी
गहिनीनाथासह सर्वच नाथ आणि गोपीनाथ यांचे आशीर्वाद मिळाल्यामुळेच माझी वाटचाल यशस्वी ठरल्याचे ,सांगत समुद्राचे पाणी गोदावरी खोर्यात आणुन ते पाणी मराठवड्याला देत नेहमीच दुष्काळग्रस्त असणारा मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचे अश्वासन देत गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी दिलेला संत वामनभाऊंचा ध्वज हा नुसता ध्वज नसुन गडाची मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, ही जबाबदारी आपला आणि गडाचा सेवेकरी म्हणून स्विकारतो असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनिनाथगड येथील संत वामनभाऊंच्या 47 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . व्यासपीठावर मठाधिपती विठ्ठल महाराज, आ.बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस,आ. लक्ष्मण पवार, आ.मोनिकाताई राजळे,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,मा.आ.भिमराव धोंडे,मा.आ.साहेबराव दरेकर,अक्षयभैय्या मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, शिवसेना प्रमुख बीड शिंदे गट कुंडलीक खांडे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दादा विधाते,निलेशजी गुट्टे, गणेश कराड,धनराज गुट्टे,सभापती सुवर्णाताई लांभरुड, काकासाहेब लांभरुड,भाऊसाहेब भवर,राजु जाधव, सरपंच मारुती सांगळे,मा.सरपंच बबन सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विधान सभेचे सत्र चालू असतानाच गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी मला भेटून पुण्यतिथीचे निमंत्रण दिले होते,परंतु 15 तारखेला डावस येथे निमंत्रण असल्याने येथे येणे निश्चित नव्हते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे गेल्याने संत वामनभाऊंच्या अघात शक्तिने मला मराठवाड्याची पंढरी गहिनिनाथ गड येथे आणले.मुंबईवरुन हेलेकँप्टरने निघताना मला आरबी समुद्राचे अफाट रुप पाहावयास मिळाले तर येथे आल्यावर भक्तांचा जनसागर पहायला मिळाला.येथे येऊन खरोखर आनंद झाला. ईश्वराच्या मनात आले,आणि वामनभाऊंच्या मनात देखील असेल त्यामुळेच येथे येण्याचा योग आला. नाथ सेवेचे मुळ गहिनिनाथ गडापासुन सुरु होते. या वारकरी परंपरेने आमचा देव, धर्म वाचला, ज्यावेळी आपल्यावर आक्रमणे होत होती त्यावेळी स्वराज्याची मशाल पेटविण्याचे कामही संतांनीच केले होते.हिंदु धर्म कधीच पंढरीची वाटचाल चुकला नाही परंतु 2021 मध्ये पंढरीच्या वारीच्या परंपरा खंडीत झाली होती, त्यावेळी मला विठ्ठल महाराजांचा फोन देखील आला होता.
तरी देखील घरी राहुन भक्तांनी पंढरीची सेवा मनोभावे केली होती. यापुढे गहिनिनाथ गडावरुन पंढरपूरला जाणार्या दिंडीत कधीच खंड पडणार नाही यासाठी, भगवानगड-गहिनिनाथ गड- पंढरपूर हा रस्ता होण्यासाठी व्यवस्था केली आहे.2017 मध्ये मी मुख्यमंत्री असताना या गडाच्या विकासासाठी 25 कोटी रूपये दिले होते, त्यामधील दोन कोटी रूपये प्राप्त झाले परंतु उर्वरित 23 कोटी रुपये बाकी असुन ते देखील देण्यात येतील. येथील विकास आराखड्याला आचार संहिता पुर्वी मंजुरी मिळाली असुन भक्तांच्या मेळाव्याकरीता देखील व्यवस्था करण्यात येईल असे सांगत समुद्राचे पाणी गोदावरी खोर्यात आणुन तेथून ते मराठवाड्यातील जिल्हयातील गावांना देऊन मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत हे काम मार्गी लागण्यासाठी संत वामनभाऊंचे आशिर्वाद मागतो आणि आपले सेवेकरी राहुन आपण आदेश करा ते गडासाठी पुर्ण करुत असे अश्वासन दिले.
प्रस्ताविक मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी केले. ते म्हणाले की,संत वामनभाऊंचा 47 वा पुण्यतिथी महोत्सव असुन वारकरी संप्रदाय गहिनिनाथ गडावरुन सुरू होतो.हे मुळ आहे.येथे स्व.विलासराव देशमुख आले होते त्यांना आम्ही मागत नव्हतो आणि ते देखील देत नव्हते.समाजाच्या सुविधा आपल्या माध्ममातुन सुटायला हव्यात अशी अपेक्षा असतात. अनेक ठिकाणी आपण कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. आपले सरकार हिंदू रक्षक आहे, आम्ही देखील हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे काम करतोत. सध्या हिंदु धर्मांचा प्रश्न ज्वलंत होत आहे या कडे लक्ष वेधले. तसेच आपली जी अपेक्षा आहे ति पुर्ण होईल असे आशीर्वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.माजी. आ. भिमराव धोंडे यावेळी म्हणाले की, येथे राज्यातील अनेक प्रमुख लोक येऊन गेले आहेत. सर्व महाराष्ट्राने येथील भक्तीभाव पाहिला आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना 25 कोटी दिले होते परंतु त्यामधील मोठी रक्कम मिळाली नाही ति द्यावी आणि भगवानगड गहिनिनाथ गड पंढरपूर हा रस्ता मार्गी लावावा तसेच केंद्राची प्रसाद योजना कार्यान्वित करावी अशी आग्रही मागणी केली.
आ. बाळासाहेब आजबे या वेळी म्हणाले की, मतदारसंघात प्रमुख श्रद्धास्थान असुन प्रत्येक एकादशीला येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तसेच पुण्यतिथीनिमित्त काम बंद ठेऊन भाविक मोठ्या भक्तीभावाने येऊन संत वामनभाऊंचा आशिर्वाद घेत असतात. बाहेरचे पाणी या मतदारसंघात आल्याशिवाय विकास शक्य नाही अशी खंत व्यक्त करीत कुंटेफळ तलावाचे पाणी आले पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली.
आ. सुरेश धस यांनी संत वामनभाऊंचा माहिमा सांगत , संत वामनभाऊ यांची पुण्यतिथी संपुर्ण देशात 500 ठिकाणी साजरी होते त्यामुळे आपण येथे लक्ष देऊन विकास करावा अशी मागणी केली. परिसर हा ओसाड ,रानमाळ असताना वामनभाऊंनी ऊसतोड कुटुंबातील मुलांना शिक्षण घेणे भाग पाडले आणि आपण शिकलो तर प्रगती होईल हा मंत्र दिल्याने परिसरातील युवक प्रमुख पदावर पहायला मिळतात. तसेच वामनभाऊ कडक होते त्यांनी एका गावात मिरच्या येणार नाहीत असे म्हणाले होते तर, आजही या गावात मिरच्या येत नाहीत तर एका कारखान्यात मि गेल्यावर आग लागेल असे म्हणाल्याने आग लागली होती, असा माहीमा सांगितला.माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील वामनभाऊंच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांच्या पाश्चात्य विठ्ठल महाराज गडाचे काम उत्तम प्रकारे चालवित असल्याचे सांगत भाऊ , बाबांनी युवकांना व्यसनापासुन दुर राहण्याचा दिलेला सल्ला आजही उपयोगी पडत आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आल्यावर विकास होत असतो आणि हा योग येथे आल्याने या गडाचा विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.सुत्रसंचालन शंकर देशमुख यांनी केले.
क्षणचित्रे
-किर्तन समाप्तीनंतर बरोबर 11.45 वाजता पुष्पवृष्टी झाली.पुष्पवृष्टी साठी डाँ.नेहरकर यांनी उपलब्ध करुन दिलेल्या हेलेकँप्टरने मंदिर परिसरात पुष्पवृष्टी करण्यात आली.
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 12 वाजता आगमन झाले.
-देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंकजाताई या पालकमंत्री असताना गडासाठी 25 कोटी दिले होते, असे म्हणताच भाविकांनी प्रतिसाद देत टाळ्या वाजवल्या.
-पत्रकार विलास बडे,डॉ. तुकाराम नेहरकर,गणेश कराड,यांचा संस्थानच्या वतीने विठ्ठल महाराज यांनी सत्कार केला.
-अंमळनेर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गोरक्ष पालवे आणि त्यांच्या टिमने चोख बंदोबस्त ठेवला.
-महिलांचा संक्रातीचा सण असल्याने महिलांची उपस्थिती नेहमीपेक्षा कमी जाणवली,परंतु भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-भाषणे संपल्यानंतर भाविकांना शिस्तबद्ध पध्दतीने प्रसादाचा आश्वाद घेतला.
-पुण्यतिथीनिमित्त मंदिरावर आकर्षक फुलांची आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
-उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असल्याने पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला असल्याने स्टेजवर प्रमुख मान्यवरच दिसुन आले.
-संस्थानच्या वतीने संत वामनभाऊ यांचे चित्र असलेला भगवा ध्वज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिला. हा ध्वज नसुन माझ्यावर गडाची मोठी जाबादारी समजुन स्विकार करतो असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
-देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या, ज्या अपेक्षा असतील त्या त्या पुर्ण होतील असा आशिर्वाद गडाच्या वतीन विठ्ठल महाराज यांनी दिला.
Leave a comment