आरोपीविरुध्द गुन्हा दाखल होणार
गेवराई । वार्ताहर
एका भामट्याने प्रत्येकी 60 हजार रुपये घेवून त्यांना चक्क उपविभागीय अधिकारी यांच्या बोगस सह्या अन् शिक्के मारुन बोगस गुंठेवार्या करुन दिल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर महसूल यंत्रणा कामाला लागली. सर्व दस्ताऐवज तपासून घेत प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन स्वत:चे उखळ पांढरे करणार्या भामट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गेवराई तालुक्यातील 32 जणांची अशा खोट्या गुंठेवार्या करुन फसवणूक झाली असल्याचे समोर आले असून या प्रकरणात तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे एसडीएम टिळेकर यांनी म्हटले आहे.
भूखंड नियमित करण्यासाठी सध्या महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 नुसार प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंतचे प्लॉट गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातर्गंत गेवराई तालुका येतो.गेवराई तालुक्यात आतापर्यंत झालेल्या गुंठेवारी प्रकरणांची माहिती उपविभागीय कार्यालयाने घेतली असता तब्बल 32 प्रकरणे बोगस गुंठेवारीचे असल्याचे उघड झाले. उपविभागीय अधिकारी टिळेकर यांनी स्वत: अभिलेख्यांची पडताळणी केली असता बोगस गुंठेवारीची नोंद कार्यालयात नसल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधिताविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी गेवराईच्या दुय्यम निबंधकांना दिल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे, हा सारा उद्योग एका खासगी संस्थेवर असणार्या शिक्षकाने केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून या भामट्याने चक्क एसडीएम नामदेव टिळेकर यांची ओळख असल्याचे त्या 32 जणांना भासवून त्यांच्याकडून पैसे उकळले. त्यांच्या बोगस सही व बनावट शिक्का तयार करुन संबंधिताना गुंठेवारीची प्रतही दिली. हा सारा प्रकार पुढे आल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात खळबळ उडाली असून आता अधिकार्यांच्या नावासह त्यांच्या सहीचा व बनावट शिक्क्याचा वापर करुन आर्थिक लूट करणार्या भामट्याविरुध्द कारवाई सुरु करण्यात आली आहे.
----------
Leave a comment