पोराला पैलवान करण्यासाठी पाच एकर जमिन विकली-सुनील तोडकर
आष्टी । रघुनाथ कर्डीले
सध्या पुणे येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू असून या स्पर्धेमध्ये 57 किलो वजन गटात आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील अतिष सुनील तोडकर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.आतिष तोडकर हा आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी असून तो अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे मात्र जिद्द आत्मविश्वास व चिकाटीच्या जोरावर त्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. हालाखीच्या परिस्थितीतही खुराकाचा खर्च वडिलांनी भागवत त्याला इथपर्यंत पोहोचण्यास मोठी मोलाची मदत केली आहे. त्यानेही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
आमचे प्रतिनिधीशी बोलताना अतिषचे वडील सुनील तोडकर यांनी सांगितले की, पोराला मोठा पैलवान बनविण्यासाठी मनावर मोठा दगड ठेवून वडिलोपार्जित पाच एकर शेती विकण्याचा जुगार मी खेळला. मात्र आता सांगायला अभिमान वाटतोय. माझ्या मुलानं मला निराश केलं नाही. 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील 57 किलो गटात अखेर त्याने सुवर्णपदक जिंकलं. मुलानं मातीचं सोनं केलं. त्यामुळे आता मला शेती विकल्याचं अजिबात दुःख वाटत नाही. तुम्हाला सांगतो, एक दिवस माझा मुलगा कुस्तीचा आंतरराष्ट्रीय आखाडाही गाजवणार, असा विश्वास सुवर्णपदक विजेत्या अतिश तोडकरचे वडील सुनील तोडकर यांनी व्यक्त केला.
आष्टी तालुक्यातील मंगळूर हे आमचं एक खेडं. पाचवीपासूनच पोराला कुस्तीचा नाद लागला. स्वतः कुस्तीपटू असल्याने मला बाळाचे पाय पाळण्यातच दिसले होते. मग दहा वर्षांपूर्वी मी त्याला दिनेश गुंड यांच्या जोग महाराज व्यायामशाळेत (आळंदी) टाकलं. पोरगं चांगल्या कुस्त्या करायला लागलं. नंतर पोरासाठी पैसा कमी पडायला लागला. साऱया गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं करता येत नाही. त्यामुळे नाइलाजाने पोरासाठी पाच एकर शेती विकावी लागली. अजून चार एकर शेती माझ्याकडे आहे. माझ्या आतिशनं शेती विकल्याचं चिज करून दाखवलं. ही त्याची तिसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होय. पहिल्या स्पर्धेत कास्य, दुसऱया स्पर्धेत रौप्य आणि आता तिसऱया स्पर्धेत त्यानं सुवर्णपदक जिंकलं. तो आतापर्यंत 16 राष्ट्रीय स्पर्धा खेळला व त्यात 3 सुवर्णांसह 8 पदक जिंकलीत. आतिष आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या मल्लांनाही हरवायला लागलाय. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे ध्येय आतिशने उराशी बाळगले आहे. मुलाला ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करताना बघण्याचं माझंही स्वप्न आहे, असं सांगताना सुनील तोडकर यांचा कंठ दाटून आला होता.
ऑलिंपिक जिंकण्याचे स्वप्न
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर अतिष तोडकर यांनी बोलताना सांगितले की, या पुढील स्वप्न माझे ऑलम्पिक जिंकण्याचे असून मी ऑलम्पिक ची जोरदार तयारी करत आहे ऑलम्पिक जिंकून आष्टीसह देशाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेता अतिष तोडकर याने व्यक्त केली.
Leave a comment