प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस.महाजन यांचा निकाल
बीड । वार्ताहर
अवैधरित्या नदीपात्रातून वाळू उत्खनन करतांना पाठलाग करून महसूल पथकाने ट्रॅक्टर पकडले. मात्र यावेळी पथकातील कर्मचार्यांना शासकीय कामकाज करतांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली गेली होती. या प्रकरणी न्यायालयात दोष सिध्द झाल्याने ट्रॅक्टर चालकासह ट्रॅक्टर मालकाला सहा महिने सश्रम कारावास 500 रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस.महाजन यांच्या न्यायालयाने आज दि.4 जानेवारी 2023 रोजी हा निकाल दिला. सरकार पक्षाच्या वतीने या प्रकरणात अॅड.अनिल बी.तिडके यांनी काम पाहिले.
राधेशाम शामराव जाधव (ट्रॅक्टर मालक) व अंकुश गणपत देवकर (ट्रॅक्टर चालक) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 30 फेब्रुवारी 2016 रोजी गेवराई तालुक्यात गोविंदवाडी येथील तलावाजवळ घडली होती. आरोपी अंकुश देवकर हा राधेशाम जाधव याच्या मालकीच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बेकायदेशीररित्या नदीपात्रातील वाळू भरून चोरून घेवून जात होता. या दरम्यान तलाठी राठोड व कर्मचार्यांनी देवकर यास ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात घेवून चल असे सांगितले. मात्र त्याने ट्रॅक्टर गेवराईच्या दिशेने नेले. कर्मचार्यांनी जीपमधून त्याचा पाठलाग केला असता तो ट्रॅक्टरसह गोविंदवाडीजवळ मिळून आला होता. त्या ठिकाणी राधेशाम जाधव व देवकर याने कारवाई करणार्या कर्मचार्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.या प्रकरणी गेवराईचे तलाठी राजेश श्रीधर राठोड यांनी फिर्याद नोंदवली होती.त्यानुसार दोघांविरूध्द गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक ए.टी.मालुसरे यांनी केला. तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा,साक्षीदारांचे जवाब नोंदवून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. सरकारी पक्षातर्फे 4 साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी व तपास अधिकारी यांचा समावेश होता. न्यायालयासमोर झालेला पुरावा व सहाय्यक सरकारी वकील अनिल तिडके यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी राधेशाम जाधव व अंकुश देवकर या दोघांना 6 महिने सश्रम कारावास व 500 रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
Leave a comment