जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांची माहिती
बीड | वार्ताहर
कुटूंब कल्याण, माता बालसंगोपन व गर्भवती तसेच बालकांच्या विविध लसीकरणात बीड जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आल्यची माहिती, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आज गुरुवारी दिली. बीड जिल्ह्याला 91 गुण मिळाले आहेत.जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी ही गौरवाची व उत्साह वाढविणारी बाब असून याचे श्रेय सर्व अधिकारी व परिचारिका व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील सर्व टिमला असल्याचेही डॉ. सुरेश साबळे यांनी म्हटले आहे.
राज्याच्या पुणे येथील राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाच्या वतीने कुटूंब कल्याण, माताबाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते.यामध्ये माता आरोग्याच्या कार्यक्रमात गरोदर मातांची नोंदणी, १२ आठवड्यापूर्वी प्रसुतीपुर्व नोंदणी, गरोदर मातांचे लसीकरण, आयएएफ गोळ्यांचे वितरण, प्रसुतीपुर्व चार तपासण्या करणे आवश्यक असतात. तसेच, बाल आरोग्यात जन्माची नोंदणी, कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण, ॲनिमियामुक्त भारत कार्यक्रमांअतर्गत पाच वर्षांखालील बालकांना आएएफएस सिरप देणे, तसेच गोळ्या देणे अपेक्षीत असते.तर, नियमित लसीकरणात बालके व गर्भवती मातांचे ठरवून दिल्याप्रमाणे लसीकरण गरजेचे असते. तसेच, जिल्हा निहाय कुटूंब नियोजनाचे उद्दिष्ट देखील देण्यात येते. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच जिल्हा रुग्णालय व अधिनस्थ ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांत वरिल आरोग्य विषयक उपक्रम उद्दीष्टपेक्षा अधिक करण्यात आले.
सर्व ग्रामीण रुग्णालयांत व जिल्हा रुग्णालयांत कुटूंब नियोजनांच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. या सर्व कामांबाबत उद्दिष्ट व प्रत्यक्ष केलेले जिल्हानिहाय काम यावरुन पुणे येथील राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालकांनी रँकींग जाहिर केले आहे. यात महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत बीड प्रथम आल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. बीड जिल्ह्याला ९१ गुण असून त्याखालोखाल गडचिरोली व पुणे प्रत्येकी ८९ गुणांसह द्वितीय व तृतीय आले आहेत. तर, ८८ गुणांसह उस्मानाबाद चौथ्या स्थानी व ८६ गुणांसह सातारा पाचव्या स्थानी आहे. या यशात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते, डॉ. संतोष शहाणे, डॉ. रौफ शेख, डॉ. संजय कदम, डॉ. राम आवाड यांच्यासह ग्रामीण व नागरी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगीतले.
Leave a comment